दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला खूप महत्त्व असते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी पूजाही केली जाते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी म्हणजेच यावर्षी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते आणि सोने, चांदी इत्यादी वस्तू खरेदी केल्या जातात. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा करण्यामागचं काय कारण आहे, ते जाणून घेऊयात….
धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा करण्याचं महत्त्व
धनत्रयोदशीचा दिवशी धन्वंतरीची पूजा करुन आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशिर्वाद मिळावा, अशी मागणी केली जाते. धन्वंतरीची कृपा मिळवण्यासाठी हा शुभ काळ मानला जातो. धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजा केल्यामुळे वर्षभर आरोग्य चांगलं राहतं. रोगांपासून मुक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. समुद्र मंथनाच्या वेळी धन्वंतरीचा जन्म आयुर्वेदिक औषधांच्या निमिर्तीसाठी झाला. त्यानंतर धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली.
भगवान धन्वंतरी कोण आहेत?
भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. आयुर्वेदाचे जनक आणि देवांचा वैद्य असलेल्या अमृताच्या भांड्यासह समुद्रमंथनाच्या वेळी ते प्रकट झाले. त्यांना देवांचे वैद्य म्हणून ओळखले जाते. त्यांच्या हातात आयुर्वेद ग्रंथ, औषधी, जडीबुटी आणि शंख आहे.
धनत्रयोदशीची कथा
धनत्रयोदशीची एक पौराणिक कथा आहे. हेमा राजाच्या पुत्राचा सोळाव्या वर्षी मृत्यू होणार होता. आपल्या मुलाला आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींचं सुख मिळावं, या उद्देशाने राजा – राणी त्याचं लग्न लावतात. लग्नानंतर चौथ्या दिवशी हेमा राजाच्या पुत्राचा मृत्यू होणार असतो. त्या रात्री त्याची बायको त्याला झोपू देत नाही. त्याच्या आजुबाजूला सोन्याच्या आणि चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. राजाचा महाल दिव्यांनी सजवला जातो. गाणी गाऊन आणि गोष्टी सांगून जागरण केलं जातं. यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपामध्ये येतो. त्याचे डोळे सोन्या चांदीचं भंडार बघून दिपतात. तो यमलोकात परत जातो. राजकुमाराचे प्राण वाचतात. त्यामुळे यादिवशी यमदीपदान केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावला जातो. या दिव्याच्या वातीचं टोक दक्षिण दिशेला केलं जातं. या दिव्याला नमस्कार केल्यामुळे अपमृत्यू टळतो, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






