लवकरच दिवाळी येतेय.. त्या निमित्ताने अनेक घरात साफसफाईला सुरूवात झालीय. तर काही ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि मिठाई बनवायचाही तयारी झालीय. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा आपल्याला मिठाईचा सुगंध आणि गोडवा जाणवू लागतो. दिवाळीचा सण पाच दिवस चालतो. दिवाळीत पाहुण्यांची सतत वर्दळ असते. अशा वेळी जर तुम्ही घरीच काही स्पेशल बनवू शकता. साध्या सोप्या रेसिपी ट्राय करू शकता. आज आपण श्रीखंड पुरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत…
साहित्य
श्रीखंडासाठी
- दही (घट्ट)
- साखर (चवीनुसार)
- वेलची पूड
- केशर
- सुकामेवा (बदाम, पिस्ता, काजू)
पुरीसाठी
गव्हाचे पीठ
मीठ
तेल
पाणी
कृती
- एक किलो दही घ्या.
- सुती कापड घेऊन त्यात दही घट्टसर बांधून ७ ते ८ तास ठेवून द्या.
- ७ ते ८ तासानंतर त्यातील पाणी निघून जाईल.
- एका छोट्याशा वाटीत चार चमचे दूध आणि त्यात केशरच्या काड्या घालून घ्या.
- दहाच्या चक्का चांगला फेटून घ्या.
- त्यात बारीक केलेली साखर घाला. त्यानंतर त्यात केशरचे दूध घाला.
- सर्व मिश्रण नीट एकत्रित करा.
- एक चमचा वेलची पूड, आवडीनुसार ड्राय फ्रूट्स टाका आणि १ तास फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा.
- गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल एकत्र करा.
- थोडे पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या.
- कणकेचे छोटे गोळे करून पुऱ्या लाटा.
- गरम तेलात पुऱ्या सोनेरी रंगावर तळून घ्या.
- अशाप्रकारे गरमागरम पुऱ्यांवर श्रीखंड घालून श्रीखंड पुरीचा आनंद घ्या.






