हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. यामध्येच दिवाळीच्या पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असली तरी हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने केली जाते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. चला तर मग यादिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या…
वसुबारस कधी आहे?
हिंदू पंचांगानुसार आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी याच दिवशी वसुबारस सण साजरा करण्यात येतो. यंदा वसुबारसचा सण शुक्रवारी 17 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे.
वसुबारस पूजा मुहूर्त
द्वादशी तिथी प्रारंभ 17 ऑक्टोबर, रोजी सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी
द्वादशी तिथी समाप्ती 18 ऑक्टोबर,रोजी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी
वसुबारस पूजेचा मुहूर्त : प्रदोषकाळी 4 वाजून 14 मिनिटांनी प्रारंभ ते 7 वाजून 43 मिनिटांनी समाप्ती होईल.
वसुबारस पूजा विधी
वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवांची पूजा करावी व दारात रांगोळी टाकून दिवे लावावे. यादिवशी गाय वासराची पूजा करण्याचे महत्व आहे. तसेच बैलाची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरात गाई आहेत त्यांनी आपल्या गाईंची व वासराची औक्षण करून पूजा करावी. गाईला हार फुले वाहावीत त्यांना कुंकू लावावे. बैलांना छान सजवावे त्यांची देखील पूजा करावी व शेवटी पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना खाऊ घालावा. तुम्ही गाईच्या गोठ्यात जाऊन देखील त्यांची पूजा करू शकता.
वसुबारसचे महत्त्व
भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा दिला आहे आणि ती पूजनीय मानली जाते. वसुबारस हा दिवस गाई आणि तिच्या वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. ‘वसु’ म्हणजे संपत्ती आणि ‘बारस’ म्हणजे द्वादशी तिथी, त्यामुळे या दिवसाला ‘संपत्तीसाठी आलेली द्वादशी’ असेही म्हणतात. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, या हेतूनेही हे व्रत केले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






