‘श्रीमत दासबोध’ मधील पहिला दशक स्तवन नाम असून, त्यातील दुसरा समास ‘गणेशस्तवन’ या नावाने ओळखला जातो, ज्यात गणेशाच्या कृपेने अज्ञान दूर होऊन ज्ञानाची प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी रचलेला असून, तो जीवनाला नवी दिशा देणारा, भक्ती आणि ज्ञानमार्गाचे मार्गदर्शन करणारा एक आध्यात्मिक ग्रंथ आहे.
दासबोधाची रचना
समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचा उद्देश मानवाला अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे आहे.
दशक पहिला, समास दुसरा गणेशस्तवन
या समासात गणपतीला वंदन केले आहे. गणपती हा सर्व सिद्धि देणारा, अज्ञान दूर करणारा आणि ज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे, अशी कल्पना केली जाते. गणेशकृपेने मनातील अज्ञान दूर होऊन ईश्वरी ज्ञान मिळावे आणि भक्ताला ग्रंथाचे सामर्थ्य प्राप्त व्हावे, यासाठी प्रार्थना केली जाते.
॥ श्रीराम ॥
॥जय जय रघुवीर समर्थ॥
ॐ नमोजि गणनायका । सर्व सिद्धिफळदायका ।
अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥
माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।
मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥
तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।
आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥
येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं ।
होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥
म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर ।
आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥
वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी ।
आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥
जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान ।
नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥
सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव ।
नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥
सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत ।
हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥
भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड ।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥
नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें ।
तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥
मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥
चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥
रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥
दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५॥
लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६॥
चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पितांबर ।
फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७॥
डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी ।
उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८॥
नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां ।
रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे ॥ १९॥
शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥ २०॥
नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥
स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण ।
साअजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३॥
ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा ।
साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥
ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु ।
त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥
ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६॥
जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७॥
जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण ।
तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८॥
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥ २९॥
ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति ।
वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥ ३०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गणेशस्तवननाम समास दुसरा ॥ २॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






