Marathi News

Saphala Ekadashi 2025 : सफला एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ व्रत कथा, मिळेल मोक्षप्राप्ती

Published:
सफला एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान श्रीहरीचे ध्यान करावे. देवाला फळे आणि नैवेद्य अर्पण करा आणि ही व्रत कथा वाचा...
Saphala Ekadashi 2025 : सफला एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ व्रत कथा, मिळेल मोक्षप्राप्ती

हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व असते. दरवर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी साजरी केली जाते. 15 डिसेंबरला म्हणजेच आज सफला एकादशी साजरी केली जाईल. जाणून घेऊया सफला एकादशीची पौराणिक कथा..

सफला एकादशी का साजरी केली जाते?

सफला एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला साजरी केली जाते, जी यशासाठी आणि मनोकामनापूर्तीसाठी महत्त्वाची मानली जाते, या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास सर्व कार्ये यशस्वी होतात, असे मानले जाते; या व्रताच्या कथेत एक राजा आणि त्याच्या पुत्राच्या कथेचा उल्लेख आहे, ज्यात राजाला केलेल्या एका चुकीची शिक्षा मिळते आणि एकादशी व्रतामुळे त्याला मुक्ती व यश मिळते.

सफला एकादशी व्रताची कथा

चंपावती नगरीमध्ये एक महिष्मान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला चार मुले होती. त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता. तो दररोज परस्त्री आणि वेश्यागमन तसेच इतर दुसर्‍या वाईट कामाकरिता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता. तसेच देवता, ब्राह्मण, वैष्णवांची निंदा करीत होता. जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कुकृत्याबाबत कळले तेव्हा त्याने त्याला राज्यातून बाहेर हाकलून दिले. पित्याने हाकलून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्‍चय केला. दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करीत असे. इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे. त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती. त्यानंतर त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून त्याला खाऊ लागला.

महिष्मान नगरीतील जनता त्याला पकडत तर असे, पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे. ज्या जंगलामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते. नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असते. त्याच झाडाच्या खाली तो महापापी लुंपक राहत होता. या जंगलाला जनता देवीदेवतांची नगरी मानत असत. काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला. त्यात मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तो कडकडू लागला. दिवस उजाडता- उजाडता तो मूच्र्छित झाला. दुसर्‍या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गर्मीमुळे त्याला जाग आली. कसाबसा स्वत:ला सावरत तो काही खायला मिळते का, हे पाहण्यासाठी फिरू लागला. पशुपक्ष्यांची शिकार करण्याइतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली. तो गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्‍वरला प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले.

दुसर्‍या दिवशी पहाटे एक अतिसुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याचवेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर, अशी आकाशवाणी झाली. ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून ‘भगवान की जय हो’ असे म्हणत पित्याकडे गेला. पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्याकरिता निघून गेला. त्यानंतर चंपावती नगरीवर लुंपक राजा राज्य करू लागला. त्याची पत्नी, पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले. वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलाच्या हाती राज्यभार सोपवून तपस्या करण्याकरिता जंगलात निघून गेला. त्यानंतर तो वैकुंठास गेला. त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्या शेवटी मुक्ती मिळते. या सफला एकादशीचे व्रत केल्याने, माहात्म्य वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्‍वमेध यज्ञाचे फळ मिळते.’

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews