Marathi News

Shri Ganesh Gita : श्री गणेश गीता संपूर्ण अध्याय ७ आणि पठणाचे महत्व जाणून घ्या

Published:
गणपती ही विद्येची आणि संकटांचे निवारण करणारी देवता असल्याने, तिच्या गीतेच्या पठणाने जीवनातील अडथळे दूर होतात.
Shri Ganesh Gita : श्री गणेश गीता संपूर्ण अध्याय ७ आणि पठणाचे महत्व  जाणून घ्या

गणेश गीतेच्या सातव्या अध्यायाच्या पठणाने पितरांना मुक्ती मिळते आणि चैतन्य ऊर्जा प्राप्त होते, असे मानले जाते. हा अध्याय भक्तीचे महत्त्व सांगतो, ज्यामुळे व्यक्तीला सर्व अडथळे दूर होतात आणि ईश्वरी कृपेची प्राप्ती होते. या अध्यायाचे पठण केल्याने पितरंना शांती आणि मोक्ष मिळण्यास मदत होते असे सांगितले जाते.

गणेश गीता अध्याय ७ पठणाचे महत्व

या अध्यायाच्या पठणाने पितरांना शांती आणि मोक्ष मिळतो, असे मानले जाते. पठणातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे मृतात्म्यांवर सकारात्मक परिणाम होतो. हा अध्याय भक्तीचे महत्त्व विशद करतो. वेद, यज्ञ, तप किंवा व्रत यांपेक्षा केवळ भगवंताच्या स्मरणाने जास्त फळ मिळते. गणपती ही विद्येची आणि संकटांचे निवारण करणारी देवता असल्याने, तिच्या गीतेच्या पठणाने जीवनातील अडथळे दूर होतात. या अध्यायाच्या पठणाने ईश्वरी कृपेची प्राप्ती होते असे मानले जाते. 

श्री गणेश गीता अध्याय

(गीति)
भूपति वरेण्य पुसतो, शुक्ल नि दुजि ती गती असे कृष्ण ।
स्पष्टपणें कैशा त्या, सांगाव्या मजसि हा असे प्रश्न ॥१॥
ब्रह्म म्हणावें कवणा, संसृति म्हणजे कशी असे काय ।
कथण्यास योग्य आपण, कथणें कृपयें करुन ती काय ॥२॥
अग्नी आणिक ज्योति, असती ज्या देवता नि गतिकाल
गमन करावें ऐसा, योग्य असे उत्तरायणीं काल ॥३॥
इंदू आणिक ज्योती, असती ज्या देवता नि गति काल
गमन करावें ऐसा, योग्य असे दक्षिणायनीं काल ॥४॥
शुक्लगती ती दिवसा, बोलति रात्रीं गतीस कृष्ण असे ।
चिन्हें गतीस असती, कथितों भूपा श्रवीं वदे ऐसें ॥५॥
या दोन गती क्रमानें, ब्रह्माला नी तशाच संसृतिला ।
कारण असती भूपा, यास्तव जाणें पुढील गोष्टीला ॥६॥
दृश्य असे जें आणिक, असतें अदृश्य तें परब्रह्म ।
मानावें द्वयरुपें, कथितों भूपा श्रवीं असें ब्रह्म ॥
पंचमहाभूतांनीं, युक्त असें जें तयास क्षर म्हणती ।
अंत तयाचा होणें, अक्षर त्यासीच नाम देताती ॥८॥
यांहून भिन्न प्राचिन, शुद्ध असें मूळ रुप तें ब्रह्म ।
समजें भूपति याचें, लक्षण हें सांगतों श्रवीं ब्रह्म ॥९॥
अनेक जन्मचि येती, संसृति वदती मुनी तिला राया ।
ते जन माझी पर्वा, करितच नाहीं तिथेंत ते विलया ॥१०॥
शोडष उपचारांनीं, माझी करिती उपासना भक्त ।
ब्रह्मपदाला पावति, कथितों भूपा मदीय तूं भक्त ॥११॥
गंधादि पूजनानीं, होतो तो ब्रह्मरुपसा भक्‍त ।
ऐसी उपासनाही, भक्‍तीपूर्वक करीतसे भक्‍त ॥१२॥
आवाहन आसन नी, ध्यान तसें स्नान पंचरसयुक्‍त ।
त्यांची इच्छापूर्ती, करितों यास्तव सुपूजनीं सक्‍त ॥१३॥
अंतःकरणापासुन, स्थीर मनानें करीत पूजन ते ।
किंवा फलपुष्पांनीं, पूजन करिती मदीय पूजक ते ॥१४॥
इच्छित मनोरथातें, पावति सारे मदीय भक्‍त असे ।
येणेंपरि यत्‍नानें, पूजन करिती सुइष्टफल ऐसें ॥१५॥
पूजाप्रकार असती, मुख्य असे तीन ते अगा राया ।
त्यांतिल मानसपूजा, मान्य असे सुलभशा विधाना या ॥१६॥
माझी उत्तम पूजा, करिती इच्छारहीत भक्‍तीनें ।
चारीं आश्रमिं मानव, लाधति फल तें श्रवींच कर्णानें ॥१७॥
पूजा करणाराला, उत्तम सिद्धी त्वरीत ती पावे ।
माझ्याशिवाय दुसर्‍या, देवांचें करिति पूजना भावें ॥१८॥
त्यांमाजी मज द्वेषिति, त्यांना लाधेल काय फल तेंच ।
कथितों विस्तृत तुजला, भक्‍त म्हणूनी भवार्थ तें साच ॥१९॥
भक्‍तीपूर्वक विधिनें, माझी नी इतर देवता यांची ।
द्वेषित बुद्धी ठेवुन, पूजा करिती गती श्रवीं त्यांची ॥२०॥
त्यांना सहस्त्र कल्प, नरकाचें दुःख भोगणें लागे ।
परिसुनि ऐशा वृत्ता, सावधपणिं तूं नृपा पुढें वागें ॥२१॥
प्राणायामाआधीं, विधि करणें भूतशुद्धीचा राया ।
नंतर प्राणायामा आसनिं अशा शुद्धशा बसे ठाया ॥२२॥
आकर्षूनि मनासी, न्यास करावा अधींच या नामें ।
अंतर-मातृक म्हणती, नंतर करणें षडंग या नामें ॥२३॥
त्यानंतर न्यासावा, मुख्य असा मूळमंत्र जपण्याचा ।
चित्ता स्थीर करुनियां, ध्यान करावें विधि जसा साचा ॥२४॥
गुरुमुखमंत्र जपावा, अर्पण करणें स्वइष्ट देवाला ।
बहुविध स्तोत्रें म्हणुनी, स्तुति करणें भक्‍तियुक्‍त पूजेला ॥२५॥
यापरि उपासना ही, माझी करितां प्रसन्न मी होतों ।
अव्यय मोक्षपदाला, पावे तो भक्यराज मी कथितों ॥२६॥
जन्मा येउन प्रानी, उपासनेविण असेच तो व्यर्थ ।
भूपा ध्यानीं धरुनि, वर्ते यापरि असेंच बोधार्थ ॥२७॥
अग्नि आज्य हवि हुत, यज्ञहि तैसा तदीय तो मंत्र ।
औषधि आदि करुनी, मदीयरुपें समस्त अणुमात्र ॥२८॥
ध्याता ध्यान नि ध्येय, स्तुतिस्तोत्रें नमन आणखी एक ।
भक्ती उपासना नी, वेदत्रयीनेंच जाणणें ऐक ॥२९॥
तीतें योग्य असे जें, पुनित असे आर्य आर्यही तात ।
ते सारे मीच असें, ऐकें भूपा पुढील श्लोकांत ॥३०॥
ॐकार पावनाणिक, साक्षी प्रभु मित्र आणखी ऐक ।
गतिलय उत्पत्तीही, पोषक बीजामृता नि शरणैक ॥३१॥
आत्मा सत्‌न्यसत्, ब्रह्मचि आहे मि जाण भूपाही ।
यास्तव कर्मं करुन तीं, अर्पण करणें असेच आज्ञा ही ॥३२॥
चारी वर्णांतिल कीं, पुरुष असो वा तशीच ती नारी ।
माझा आश्रय सारे, करिती हें कथितसें सदाचारी ॥३३॥
मुक्‍तचि सारे होती, सु-भक्‍त ब्राह्मण तसेच होतील ।
माझीं रुपें जाणति, ते सारे नष्टकाय होतील ॥३४॥
माझी माझ्या विभुती, जन्मति कैशा मुनी नि देवांस ।
कळतसे हें राया, परि मी व्यापी समस्त जगतास ॥३५॥
जे तेजस्वी श्रेष्ठहि, या लोकीं ते विभूति असतात ।
ऐसा उपासनेचा, योग तुला सांगसा कथित यांत ॥३६॥
सप्तम अध्यायासी, कवित्वरुपें सुगंधशीं कुसुमें ।
गुंफुन माला कंठीं, घाली प्रभुच्या सुभक्‍तिनें प्रेमें ॥३७॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews