हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण अत्यंत शुभ मानला जातो. तो सूर्य देवाच्या उपासनेला आणि दानधर्माला समर्पित आहे. संक्रातीच्या सणाला तीळ आणि गुळाचे लाडू किंवा वड्या आवर्जून खाल्या जातात. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात जे थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची पूर्तता करतात. तसेच गुळातही उष्णता असल्याने थंडीच्या दिवसात आवर्जून सेवन केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी घरात अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तिळाची वडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…
साहित्य
- पांढरे तीळ
- गूळ
- तूप
कृती
- कढईत तीळ मंद आचेवर सतत हलवत खरपूस भाजून घ्या. तीळ फुलले आणि खमंग वास आला की गॅस बंद करा आणि तीळ थंड होऊ द्या.
- तुपात गूळ वितळवून घट्ट पाक होईपर्यंत शिजवा (पाण्यात टाकल्यावर गोळी बनली पाहिजे) गूळ मंद आचेवर वितळू द्या. आणि त्यात भाजलेले तीळ मिसळा.
- पोळपाट आणि लाटण्याला थोडे तूप लावा. तयार मिश्रण त्यावर काढून जाडसर लाटून घ्या.
- मिश्रण गरम असतानाच सुरीने चौकोनी किंवा शंकरपाळीच्या आकारात वड्या कापून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर वड्या वेगळ्या करा.
टिप्स
- पांढरे तीळ (साल न काढलेले) वापरल्यास वड्यांना छान चव येते आणि त्या मऊ होतात.
- मऊ वड्यांसाठी गूळ योग्य प्रमाणात आणि योग्य पाकात वितळणे महत्त्वाचे आहे.
- अगदी तोंडात विरघळणाऱ्या वड्यांसाठी गुळाचे प्रमाण तीळांच्या बरोबरीने ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






