Ganesh Chaturthi Prasad Recipes: मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी बाप्पा थाटामाटात विराजमान झाले आहेत. ग्रामीण भागांमध्ये प्रत्येकजण एकमेकांच्या घरामध्ये बाप्प्पाच्या आरतीला जातात. बाप्पाच्या आरतीनंतर सर्वांना प्रसाद दिला जातो. प्रसादामध्ये विविध गोड पदार्थ दिले जातात. पण तुम्ही कधी प्रसादात पंचखाद्य खाल्ले आहे का. हा अगदी पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ आहे.
पंचखाद्य विशेषतः कोकणात बनवला जाणारा प्रसादाचा पदार्थ आहे. यामध्ये अनेक पौष्टिक गोष्टी एकत्रित करून बनवण्यात येते. अलीकडे अनेक स्त्रिया कामानिमित्त घराबाहेर असतात, त्यामुळे घरी कमी वेळेत प्रसाद बनवायचे असेल तर पंचखाद्य अगदी उत्तम आहे. यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. आज आपण पंचखाद्य बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत.
पंचखाद्य बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य-
सुकं खोबरं- १ कप
काजू- १ कप
चणा डाळ- १ कप
शेंगदाणे- १ कप
गूळ- १ कप
लाह्या- ४ ते ५ कप
वेलचीपूड- गरजेनुसार
पाणी- गरजेनुसार
पंचखाद्य बनवण्याची पारंपरिक पद्धत-
पंचखाद्य बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कढई गरम करून त्यामध्ये काजू, खोबरे, चण्याची डाळ आणि शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यावे.
आता एक भांडे घेऊन त्यामध्ये गूळ बारीक किसून घ्यावा. त्यामध्ये गरजेनुसार पाणी मिसळून चांगला पाक बनवणून घ्यावा.
नंतर या पाकामध्ये भाजून घेतलेले सर्व पदार्थ घेऊन एकत्र करावेत. यामध्ये लाह्यासुद्धा घालून चांगले मिक्स करावे.
अशाप्रकारे गणेश चतुर्थीमध्ये वाटला जाणारा प्रसादाचा पंचखाद्य तयार आहे.






