7 सप्टेंबरला पितृ पौर्णिमेला चंद्रग्रहण; व्रत कसे करावे, ग्रहणाचे कोणते नियम पाळायचे? जाणून घ्या सगळं काही…

Written by:Rohit Shinde
Published:
7 सप्टेंबरला पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. 2025 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1.26 पर्यंत असणार आहे.
7 सप्टेंबरला पितृ पौर्णिमेला चंद्रग्रहण; व्रत कसे करावे, ग्रहणाचे कोणते नियम पाळायचे? जाणून घ्या सगळं काही…

चंद्रग्रहण आणि सुर्यग्रहणाला भारतात अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व दिले जाते. यामध्ये 7 सप्टेंबरला पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. 2025 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1.26 पर्यंत असणार आहे. तर पूर्ण चंद्रग्रहण रात्री 11.42 ते 12.47 पर्यंत असणार आहे. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत असतो. पूर्ण ग्रहणादरम्यान, चंद्र लाल होईल आणि हे दृश्य सुमारे 65 मिनिटे दिसणार आहे.

पूर्ण चंद्रग्रहणाची विशेषता नेमकी काय?

पूर्ण चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली पूर्णपणे चंद्रावर पडते. या वेळी चंद्र काळसर लालसर दिसतो, ज्याला “ब्लड मून” असेही म्हणतात. ही घटना खूप दुर्मिळ असते आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. ग्रहणाच्या वेळी खगोलशास्त्रज्ञ विविध संशोधन करतात. भारतीय संस्कृतीत चंद्रग्रहणाला धार्मिक महत्त्वही आहे. लोक या काळात उपवास, जप आणि प्रार्थना करतात. तसेच ग्रहण संपल्यावर स्नान व दान करण्याची परंपरा आहे. पूर्ण चंद्रग्रहण ही निसर्गातील अद्भुत दृश्य मानले जाते.

भारतातील कोणत्या शहरातून ग्रहण दिसणार?

हवामान स्वच्छ असल्यास भारतातील या 15 शहरांमध्ये चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, लखनौ, जयपूर, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना, भोपाळ आणि भुवनेश्वर. कोलकाता, गुवाहाटी सारख्या पूर्व भारतात चंद्रोदय लवकर झाल्यामुळे ग्रहणाची सुरुवात अधिक स्पष्टपणे पाहता येते. त्याच वेळी, मुंबई आणि अहमदाबाद सारख्या पश्चिम भारतात ग्रहण पूर्णपणे दिसेल, परंतु चंद्रोदयाची वेळ थोडी उशिरा असेल. हिंदू मान्यतेनुसार, सूतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या 9 तास आधी सुरू होईल.

पितृ पौर्णिमेला चंदग्रहण; व्रत-ग्रहणाचे नियम

श्राद्ध पक्ष लवकरच सुरू होत आहे. यावर्षी श्राद्ध पक्षाला विशेष महत्त्व आहे. कारण पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रहण आहे. 7 सप्टेंबरला भाद्र महिन्याची पौर्णिमा आहे. याला पितृ पौर्णिमा किंवा श्राद्ध पौर्णिमा म्हणतात. यावेळेस श्राद्ध पौर्णिमेला पूर्ण चंद्रग्रहण आहे. तसेच अश्विन कृष्ण पक्षाची सुरुवात चंद्रग्रहणात होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार 7 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी चंद्रग्रहणाचे वेध लागतील. रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. ग्रहण 8 तारखेला रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी संपेल. म्हणजेच हे चंद्रग्रहण एकूण 3 तास 29 मिनिटे चालेल. त्यामुळे 7 तारखेला दुपारी 12 वाजून 57 मिनिटांपूर्वी मंदिरांचे दरवाजे बंद केले जातील. देव आणि पितृ कार्य सुद्धा याच वेळेत करावे लागतील. श्राद्ध पक्षात ज्या लोकांचे श्राद्ध पौर्णिमेला आहे, त्यांनी ब्राह्मणांना भोजन 12 वाजून 57 मिनिटांच्या आधीच द्यावे.

श्राद्ध पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य ऋषींचे तर्पण करतात. ज्या लोकांचा मृत्यू कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला झाला आहे त्यांचे श्राद्ध तर्पण सुद्धा याच दिवशी करतात. या दिवशी अगस्त्य ऋषींचे तर्पण दुपारच्या आधी करावे असा नियम आहे. त्यामुळे श्राद्ध तर्पण 12 वाजून 57 मिनिटांच्या आधी करणे चांगले राहील.

शास्त्रानुसार, ग्रहणानंतर पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करणे उत्तम मानले जाते. अश्विन कृष्ण प्रतिपदा तिथीला ग्रहण संपल्यावर पितरांना तर्पण करणे चांगले राहील. यामुळे पितृ संतुष्ट आणि प्रसन्न होतील. ग्रहणानंतर पितरांना तृप्त करणे खूप महत्वाचे आहे.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews