धाराशिवच्या तुळजापुरात शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात होत असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली आहे. आज दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. आई तुळजाभवानीने महीषासुराचा वध केल्यामुळे आणि या नऊ दिवसामध्ये तुळजाभवानीचे आणि महीषासुराचे जे युध्द झाले त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीची सांगता होऊन, देवीची यात्रा तुळजापुरात संपन्न होते. देवी मंचकी निद्रा संपून पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापित होते.
तुळजाभवानीच्या दर्शनसाठी भाविकांची गर्दी
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील तुळजा भवानी देवीच्या दर्शनाला सुरुवात झाली असून, तुळजा भवानी देवी ही स्थानिक लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी देवी विश्रांतीत असतानाही भक्तांना दर्शन मिळेल यासाठी विशेष सोय केली जाते. पहाटे देवीला जागवून पूजा आणि आरती करून नवरात्रोत्सवाचे विधी संपन्न केले जातात.
घटस्थापना होऊन कलेक्टर साहेबांच्या हस्ते प्रतिपदापासून नवमीपर्यंत ब्राह्मणाला वर्णी दिली जाते. विधी झाल्यानंतर अष्टमी दिवशी हवन केल जाते. नवरात्रोत्सव हा प्रत्येक वर्षी आश्विन महिन्यात साजरा केला जातो आणि हा देवीच्या नऊ रूपांना समर्पित असतो. या उत्सवात भक्त उपवास करतात, देवीची पूजा करतात, आणि गरबा, दांडिया यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. हे नऊ दिवस भक्तांसाठी आध्यात्मिक शांती व आनंदाचे आहेत.
धाराशिवमधील तुळजाभवानी देवीचे महात्म्य
तुळजाभवानी देवी ही धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे वसलेली आहे. ही महाराष्ट्रातील अष्टादश शक्तिपीठांपैकी एक मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीनेच भाळावर ठेवलेली तलवार म्हणजेच “भवानी तलवार” दिली असे मानले जाते. त्यामुळे या देवतेला विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भक्तांच्या संकटांचा नाश करून त्यांना शौर्य, धैर्य आणि संरक्षण देणारी ही आदिशक्ती मानली जाते. महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. तुळजाभवानीचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होते आणि जीवनात आनंद, शांती व समाधान लाभते.






