देशभरात भगवान शंकराची अनेक चमत्कारिक मंदिरे आहेत, जिथे भक्त आपल्या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रद्धेने येतात. अशाच एका अद्भुत मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये असलेले हे मंदिर मकर संक्रांतीच्या दिवशी एका विलक्षण चमत्काराचे साक्षीदार ठरते.
कोणते आहे ऐतिहासिक मंदिर
आम्ही तुम्हाला ज्या मंदिराबाबत सांगत आहोत ते आहे गवी गंगाधरेश्वर मंदिराबद्दल. येथे विज्ञान आणि श्रद्धा यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. बेंगळुरूच्या गवीपुरम भागात वसलेले हे मंदिर सुमारे तीन हजार वर्षे जुने असल्याचे मानले जाते. “गवी” म्हणजे गुहा आणि “गंगाधरेश्वर” म्हणजे भगवान महादेव. हे मंदिर गुहेसारख्या रचनेत असून, येथे भगवान शिव विराजमान आहेत.
मकर संक्रांतीच्या दिवशी येथे असे काही घडते, जे वर्षातून फक्त एकदाच पाहायला मिळते. संध्याकाळी सुमारे ५ वाजता, सूर्य मावळतीकडे झुकलेला असताना, सूर्यकिरणांची एक सरळ रेषा तयार होते. हे किरण प्रथम मंदिराबाहेरील खांबांवर पडतात, त्यानंतर नंदी महाराजांच्या शिंगांना स्पर्श करतात आणि अखेर थेट गर्भगृहातील शिवलिंगावर पडतात. हा प्रसंग पाहणाऱ्यांसाठी थक्क करणारा असतो. असे मानले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दिशा बदलतो आणि याच दिवशी तो भगवान शिवांचा अभिषेक करण्यासाठी येथे येतो व त्यांचे आशीर्वाद घेतो.
आणखी वैशिष्टे काय
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान शिवांना अर्पण केलेले दूध वाया जात नाही. मंदिर प्रशासन हे दूध गोळा करून त्याचे दही किंवा ताक बनवते आणि दुसऱ्या दिवशी ते प्रसाद म्हणून भाविकांना वितरित केले जाते. मंदिर प्रशासनाचा ठाम विश्वास आहे की अन्नाचा अपव्यय होऊ नये. त्यामुळे दूध पूर्णपणे स्वच्छ पद्धतीने वेगळे केले जाते. कोणताही सिंदूर किंवा दूषित पदार्थ त्यात मिसळला जात नाही. शुद्ध दूध आंबवून ताक तयार केले जाते आणि भक्तांना दिले जाते. श्रद्धा, शिस्त आणि विज्ञान यांचा असा अद्भुत संगम असलेले गवी गंगाधरेश्वर मंदिर आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.






