भारतीय क्रिकेटपट विराट कोहलीसह देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती ज्यांच्यापुढे नतमस्तक होतात त्या प्रेमानंद महाराजांची (Premanad Maharaj) तब्येत बिघडली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव प्रेमानंद महाराजांचा प्रसिद्ध मॉर्निंग वॉक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. श्री हित राधा केली कुंज यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. दररोज सकाळी हजारो भाविक त्यांची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यावर जमतात, परंतु आता आरोग्याच्या कारणास्तव हा दौरा थांबवण्यात आला आहे. संत प्रेमानंद महाराजांचे अनुयायी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहेत.
महाराजाना किडनीचा त्रास
माहितीनुसार प्रेमानंद महाराज बऱ्याच काळापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांना नियमित डायलिसिसची आवश्यकता आहे. यामुळे, गेल्या दोन दिवसांपासून ते सकाळच्या पदयात्रेला जात नाहीत. श्री हित राधा केली कुंज परिकर यांनी जारी केलेल्या सूचनेमध्ये असे लिहिले होते, “राधे राधे! श्री हरिवंश! तुम्हा सर्वांना कळविण्यात येते की, पूज्य महाराजांच्या प्रकृतीमुळे, पहाटे ४:०० वाजता पूज्य महाराज जी श्री हित राधा केली कुंजला जात असत ती यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. म्हणून, तुम्हा सर्वांना विनंती आहे की पूज्य महाराज जींचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर उभे राहू नका.”
प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) वृंदावनातील श्री कृष्ण शरणम सोसायटीमध्ये राहतात. दररोज सकाळी ४ वाजता ते सोसायटीमधून श्री हित राधा केली कुंज आश्रमात चालत जातात. या काळात, भाविक त्यांची एक झलक पाहण्यासाठी रात्रभर वाट पाहत असतात, मार्गावर रांगोळी काढतात आणि फुलांचा वर्षाव करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराजांनी या पदयात्रेला सुरुवात केली नाही, ज्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आता त्यांची पदयात्रा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
भक्तांना आवाहन – Premanand Maharaj
भक्तांना सकाळच्या यात्रेसाठी रस्त्यावर जमू नये आणि संत महाराजांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रेमानंद महाराजांची यात्रा यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आरोग्याच्या कारणास्तव अनेक दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.






