दसऱ्याच्या काळात शस्त्रपूजन का करतात, खरे कारण काय? शस्त्रपूजनाची योग्य पद्धत जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
02 ऑक्टोबरला देशभरात विजयादशमी दसरा साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी एक दिवस आधी म्हणजेच आज किंवा काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. शस्त्रपूजेची कारणे, मुहूर्त आणि योग्य पद्धत जाणून घेऊ...
दसऱ्याच्या काळात शस्त्रपूजन का करतात, खरे कारण काय? शस्त्रपूजनाची योग्य पद्धत जाणून घ्या!

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला म्हणजेच दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते. यंदा दसरा 02 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. या दिवशी काही परंपरा पाळल्या जातात. जसे की, रावण दहन, शमीची पूजा, आपट्याच्या पानाची पूजा आणि शस्र पूजा. यापैकी शस्र पूजनाची परंपरा वर्षानुवर्षे केली जात आहे. आज अथवा उद्या सर्वत्र शस्त्र पूजा केली जात आहे.

शस्त्र पूजनाची कारणे, मुहूर्त आणि योग्य पद्धत

शारदीय नवरात्रीनंतर अश्विन शुक्ल पक्षाच्या शुद्ध पंधरवड्याच्या दहाव्या दिवशी दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याला दुर्गा विसर्जन केले जाते आणि संध्याकाळी रावण दहन केले जाते. दसऱ्याला शस्त्र पूजादेखील केली जाते. घरातील सर्व शस्त्रांची यावेळी पूजा केली जाते. तसंच या दिवशी देवी अपराजिताची देखील पूजा केली जाते. देवी अपराजिता यांच्या आशीर्वादाने व्यक्तीचे धैर्य आणि शौर्य वाढते आणि त्यांना यश मिळते.

दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेदरम्यान दोन शुभ योग निर्माण होतील. शस्त्रपूजेदरम्यान सुकर्म योग आणि धृती योग असे दोन योग निर्माण होतील. सुकर्म योग सकाळपासून रात्री 11 वाजून 29 मिनिटांपर्यंत प्रभावी राहील. त्यानंतर धृती योग तयार होईल. रवि योग दिवसभर प्रभावी राहील. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेदरम्यान श्रावण नक्षत्र सकाळी 9:13 ते मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहील.

दसरा 02 ऑक्टोबर रोजी आहे. अश्विन शुक्ल दशमी तिथी म्हणजेच दसऱ्याच्या दहाव्या दिवशी संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर एकादशी तिथी असते. दसऱ्याच्या विजय मुहूर्तावर पूजा केली जाते. या वर्षी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 2 वाजून 09 मिनिटांपासून ते 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत आहे. या काळात शस्त्रपूजा केली जाईल. शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त हा सर्वात मोठा शुभ मुहूर्त आहे.

शस्त्रपूजेची योग्य पद्धत

दसऱ्याला सर्व शस्त्रे गोळा करून, ती स्वच्छ करून एकाच ठिकाणी ठेवली जातात. त्यानंतर सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून घ्या. मग त्यांना गंध, हळद-कुंकू लावा. त्यानंतर फुले, अक्षता, शमीची पाने असे सर्व अर्पण करून शस्त्रांची पूजा केली जाते. यादरम्यान तुम्ही शस्त्र देवता पूजानम, रक्षाकर्ता पूजानम या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल. शस्त्रपूजन करताना देवी अपराजिता यांना समर्पित ‘ओम अपराजिताय नम:’ या मंत्राचा जप करा. तिच्या आशीर्वादाने तुम्ही कायम विजयी व्हाल.

शस्त्रपूजा का केली जाते, कारण काय?

भारतीय सैन्य दसऱ्याला शस्त्रपूजा करते. पूर्वीच्या राजांच्या काळातही शस्त्रपूजा केली जात असे. शस्त्रे धैर्य आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. शस्त्रपूजेच्या दिवशी पूर्वीच्या काळी राजे प्रगतीचे प्रतीक मानून राज्यांच्या सीमा ओलांडत कूच करत. या दिवशी केलेली पूजा विजय, धैर्य, यश आणि समृद्धी प्रदान करते.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews