हिंदू धर्मात तुळशीचे घरासमोरील स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशी ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते आणि तिची पूजा केल्याने घरात शांती, सौभाग्य आणि समृद्धी येते असे मानले जाते. घरासमोर तुळशी लावणे हे धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. तुळशीचे पान औषधी गुणांनी परिपूर्ण असून वातावरण शुद्ध ठेवते. तुळशीच्या पूजेने पापांचा नाश होतो, मन शुद्ध होते आणि भक्तीभाव वाढतो. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे तुळशीची पूजा ही केवळ धार्मिक कर्मकांडे नसून जीवनातील आध्यात्मिक आणि आरोग्यदायी संतुलन राखणारी परंपरा आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी तुळशीची जोपासना करताना काही अध्यात्मिक नियमांचे पालन आवश्यक आहे.
तुळशीची जोपासना आणि पूजा, नियम काय?
हिंदू कुटुंबामध्ये जवळपास सर्वांच्याच घरात तुळस असते, तुळशीचं झाडं हे बाल्कनी, घराचं टेरेस किंवा घराच्या छतावर लावलं जातं. मात्र इथे एक गोष्ट आवश्य लक्षात ठेवावी की, केवळ तुळशीचं झाड लावल्यानं तुमचं काम संपत नाही तर त्यासाठी काही खास नियम आहेत, त्यांचं देखील पालन करावं लागतं. घरात तुळस असेल तर तुळशीला दररोज सकाळी जल अर्पण करणं शुभ मानलं जातं. सकाळी स्नान करून तुळशीला जल अर्पण करावं, तुळशीची पूजा करावी, तुळशीला प्रदक्षिणा मारावी. जर तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण केलं तर तुळशीचं झाड डेरेदार राहातं. घरात शुद्ध ऑक्सिजन येतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरात सदैव शांती राहाते, सुख समृद्धी येते.
रविवार आणि एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला स्पर्श करू नका, रविवार हा भगवान सूर्य यांना समर्पित आहे, तर एकादशी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी तुळशीला स्पर्श करणं, पानं तोडणं, जल अर्पण करणं हा तुळशीचा अपमान समजला जातो, यामुळे तुमच्यावर भगवान विष्णूची अवकृपा होऊ शकते. तुळशीच्या जवळ चुकूनही शिवलिंग ठेवू नये, असं करणं शास्त्रात निशिद्ध मानण्यात आलं आहे, असं केल्यास तुमच्या घरात वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.
तुळशीचे औषधी गुणधर्म नेमके काय?
तुळशी ही आयुर्वेदातील सर्वाधिक महत्वाची औषधी वनस्पती मानली जाते. तिच्यातील प्रतिजैविक, प्रतिव्हायरल आणि प्रतिऑक्सिडंट गुणधर्मामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला, दमा आणि ताप यावर तुळशीचा काढा उपयुक्त ठरतो. पचनशक्ती सुधारण्यासाठी व पोटाचे विकार दूर करण्यासाठी तुळशी प्रभावी आहे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवते. तणाव कमी करून मन शांत ठेवते. त्वचारोगांवर व मुरुमांवर तुळशीचा रस किंवा लेप उपयुक्त आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास तुळशी सहाय्यकारी ठरते. वातावरण शुद्ध करणारी ही वनस्पती दैनंदिन जीवनात आरोग्य व समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक मानली जाते. त्यामुळे एकंदरीत अध्यात्मिक आणि औषधी उपयोग महत्वाचे आहेत.






