Marathi News

पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर; आंदेकर कुटुंबाची सगळी बँक खाती सील

Written by:Rohit Shinde
Published:
पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता आंदेकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. पोलिसांनी आंदेकर कुटूंबाची सगळी बॅंक खाती आणि लॅाकर सील केले आहे.
पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर; आंदेकर कुटुंबाची सगळी बँक खाती सील

पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा अलीकडच्या काळातील एक चिंतेचा विषय बनताना दिसत आहे. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात सातत्याने नवनव्या अपडेट्स समोर येत आहेत.  या प्रकरणात पोलिसांनी वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकरला अटक केली आहे. तर आता या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

आंदेकर कुटुंबाला पोलिसांचा दणका

पोलिसांनी आंदेकर कुटूंबाची सगळी बॅंक खाती आणि लॅाकर सील केले आहे. याचबरोबर सगळ्या मालमत्तांची माहिती नोंदणी महानिरीक्षकांकडून घेऊन फॅारेन्सिक ॲाडिटर द्वारा तपास करुन जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.  आंदेकरांनी सुरू केलेल्या कंपन्यांच्या डायरेक्टरची ही चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत छापेमारी करत कारवाई केली आहे. तर दुसरीकडे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सोनाली आंदेकर हिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरण काय?

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गेल्या वर्षी कौटुंबिक वादातून गणेश कोमकरकडून हत्या करण्यात आली होती. याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने 5 सप्टेंबर रोजी गणेश कोमकरचा मुलगा आयुष ऊर्फ गोविंद कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत आंदेकर टोळीचा मुख्य बंडूअण्णा राणोजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान, सुजल मेरगू, अमित पाटोळे, यश पाटील यांना अटके केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

तपास यंत्रणांना संशय आहे की या हत्येमागे जुने वाद, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक शत्रुत्व असू शकते. पोलिसांनी अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील गुन्हेगारी पार्श्वभूमी, पैशांचे व्यवहार आणि गटांमधील संघर्ष यामुळेच अशी हिंसक प्रकरणे घडत असल्याचे बोलले जाते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews