Marathi News

पुणे-बंगळुरू महामार्गावर डीआरआयची मोठी कारवाई; परदेशी महिलेकडून 7.5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Written by:Rohit Shinde
Published:
गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून बंगळुरूकडे अंमली पदार्थ घेऊन प्रवास करणाऱ्या महिलेवर डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
पुणे-बंगळुरू महामार्गावर डीआरआयची मोठी कारवाई; परदेशी महिलेकडून 7.5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई- पुणे -बेंगळुरू महामार्गावर अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अर्थात डीआरआयच्या पुणे विभागाने एका परदेशी महिलेकडून सुमारे ३.८१५ किलो मेथाम्फेटामिन जप्त केले असून, या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्ये सुमारे ७.६३ कोटी रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.

परदेशी महिलेकडे 7.5 कोटींचे अंमली पदार्थ

ही महिला दिल्लीहून बेंगळुरूकडे खासगी बसने प्रवास करत होती. गोपनीय माहितीच्या आधारे डीआरआयने ही कारवाई केली. पुणे सीमाशुल्क विभागाच्या सहकार्याने मुंबई-बेंगळुरू महामार्गावर संबंधित बसवर नजर ठेवण्यात आली. महिलेची तपासणी करण्यात आली असता सुरुवातीला सामानात संशयास्पद काहीही आढळले नाही. मात्र बसची सखोल झडती घेतल्यानंतर मागील बाजूस लपवलेली एक अतिरिक्त पिशवी सापडली. त्या पिशवीत सलवार-सूट ठेवलेले होते आणि प्रत्येक कपड्याच्या पट्ट्यामध्ये पारदर्शक आवरणात पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ सापडला. अंमली पदार्थांची किंमत 7.5 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंमली पदार्थ जप्त, परदेशी महिलेला अटक

प्राथमिक तपासणीत या पदार्थाचे स्वरूप ‘मेथाम्फेटामिन’ असल्याचे निष्पन्न झाले असून, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित परदेशी महिलेला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज तस्करी रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणातील सर्व अंमली पदार्थ डीआरआयने जप्त केले असून संबंधित परदेशी महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. डीआरआयकडून या प्रकरणाची अधिकची तपासणी करण्यात येत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews