आधी लिव्ह इन पार्टनरला मारलं, मग स्वत:लाही संपवलं; कोल्हापुरात लिव्ह इन रिलेशनशीपचा धक्कादायक शेवट

Written by:Smita Gangurde
Published:
लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या हत्येनंतर आरोपी तरुणानेही आत्महत्या केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आधी लिव्ह इन पार्टनरला मारलं, मग स्वत:लाही संपवलं; कोल्हापुरात लिव्ह इन रिलेशनशीपचा धक्कादायक शेवट

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांसंदर्भात अनेक धक्कादायक बातम्या गेल्या काही वर्षात समोर आल्या आहे. लिव्ह इन पार्टनरचे तुकडे करण्यापर्यंत गुन्हेगारीनं रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान कोल्हापूरातही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

समीक्षाची निघृणपणे हत्या…

कोल्हापुरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (२३) असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी गेल्या सहा महिन्यांपासून सतीश यादव या तरुणासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि समीक्षा घर सोडून आपल्या मैत्रिणीकडे राहायला गेली. मात्र सतीश यादव समीक्षाकडे लग्नाचा तगादा लावत होता. मात्र सतीशची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने समीक्षाने त्याला लग्नाला नकार दिला. त्यात संतापलेल्या सतीशने समीक्षा पुन्हा घरी आल्यानंतर तिची हत्या केली. यानंतर सतीश यादव याने आपल्या मूळगावी जाऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी सतीशचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

चाकू थेट बरगड्यांमध्ये घुसवला…

मिळालेल्या माहितीनुसार, सतीशसोबत वाद झाल्यानंतर समीक्षा मैत्रिणीसोबत राहत होती. दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करीत होत्या. काही वर्षांपूर्वी समीक्षाच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे घराचा आर्थिक भार समीक्षाच्या खांद्यावर होता. तिची आई मासेविक्रीचं काम करीत होती. मंगळवारी समीक्षा आपलं सामान आणण्यासाठी मैत्रिणीसोबत सरनोबतवाडी येथील घरी गेली होती. याबाबत सतीशला कळताच तो पुढील १५ मिनिटात तेथे दाखल झाला. यावेळी दोघांमध्ये लग्नावरुन वाद झाला. या रागात सतीशने समीक्षाच्या छातीत चाकू खुपसला. हा वार इतक्या जोरात केली की तो चाकू समीक्षाच्या बरगड्यांमध्ये घुसला. यानंतर समीक्षाच्या मैत्रिणीने मित्राला बोलावून तिला तातडीने रुग्णालयात हलविले.

चार वर्षांपूर्वी समीक्षाचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणास्तव ती आपल्या नवऱ्यासोबत राहत नव्हती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने समीक्षा सतीशसोबत लग्न करण्यात तयार नसल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Follow Us :GoogleNews