Dashavatar Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णक्षण! ‘दशावतार’ ऑस्करच्या 150 चित्रपटांच्या यादीत

Published:
दशावतार’ हा ऑस्कर स्क्रीनर रूममध्ये दाखल होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. येथे ऑस्कर अकादमीचे सदस्य चित्रपटाचे बारकाईने परीक्षण करतात आणि त्यानंतर पुढील मतदानाची प्रक्रिया सुरु होते.
Dashavatar Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णक्षण! ‘दशावतार’ ऑस्करच्या 150 चित्रपटांच्या यादीत

Dashavatar Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीसाठी   अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दशावतार’ हा चित्रपट थेट ऑस्करच्या अधिकृत कंटेन्शन लिस्टमध्ये समाविष्ट झाला आहे. जगभरातून सादर होणाऱ्या हजारो चित्रपटांच्या स्पर्धेत मराठी चित्रपटाला अशी मान्यता मिळणे ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

दरवर्षी ऑस्कर अकादमीकडे 2000 पेक्षा जास्त चित्रपट विविध श्रेणींसाठी सादर केले जातात. त्यापैकी केवळ 150 ते 250 कलाकृतींची प्राथमिक कंटेन्शन लिस्ट तयार होते. ही यादी ऑस्करच्या मुख्य स्पर्धेतील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. या कठोर प्रक्रियेमध्ये ‘दशावतार’ने आपले स्थान पक्के केले असून मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवा टप्पा गाठला आहे.

पहिला मराठी चित्रपट

ही निवड मिळाल्यामुळे ‘दशावतार’ हा ऑस्कर स्क्रीनर रूममध्ये दाखल होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. येथे ऑस्कर अकादमीचे सदस्य चित्रपटाचे बारकाईने परीक्षण करतात आणि त्यानंतर पुढील मतदानाची प्रक्रिया सुरु होते. जगातील दिग्गज चित्रपटांसोबत स्पर्धेत उतरणे हे कोणत्याही उद्योगासाठी अभिमानाची बाब आहे आणि मराठीसाठी ही पहिलीच वेळ आहे.

दिग्दर्शकाने व्यक्त केली भावना

या यशानंतर दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी आपल्या भावना सोशल मीडियातून व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले की, कष्ट, प्रामाणिकता आणि मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत नसली तर कोणत्याही यशाचा अर्थ नाही. पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द आणि विश्वास ठेवणाऱ्या टीमची साथ मिळाली तर कठीण मार्गही सोपा होतो. अनेक वर्षांच्या मेहनतीची घेतली गेलेली दखलच या यशाचे खरे सुख असल्याचे त्यांनी सांगितले.Dashavatar Marathi Movie

त्यांनी पुढे लिहिले की, ‘दशावतार’ निवडला गेल्याचा आनंद तर आहेच, पण त्याहून मोठा आनंद म्हणजे मराठी चित्रपट जागतिक पातळीवर तितक्याच ताकदीने उभा राहू शकतो हे सिद्ध झाले आहे. जिंकणं-हारणं नंतर ठरते, पण जागतिक पातळीवर मराठी चित्रपटाला दिलेली दखल हीच खरी जिंक आहे. आम्ही इथे थांबणार नाही. सतत नवे प्रयोग, नवीन सिनेमा आणि मराठीची पत उंचावण्याचा प्रयत्न करत राहू, असेही त्यांनी नमूद केले.

कोकणातील संस्कृतीचा जिवंत अनुभव Dashavatar Marathi Movie

‘दशावतार’ हा चित्रपट कोकणातील संस्कृतीचा जिवंत अनुभव देतो. कोकणातील लोकांची परंपरा, त्यांची खडतर जीवनशैली, दशावतारी नाट्यकला, तिथला निसर्ग, दाट देवराया आणि त्यातील गूढता या सर्वांचा सुरेख मिलाफ चित्रपटात पाहायला मिळतो. स्थानिकतेला ग्लोबल स्तरावर पोहोचवण्यात चित्रपट यशस्वी ठरल्याचे समीक्षकांनीही नमूद केले आहे. ‘दशावतार’ची ऑस्करकडे घेतलेली झेप ही केवळ एका चित्रपटाची उपलब्धी नसून संपूर्ण मराठी चित्रपट उद्योगासाठी प्रेरणादायी ठरली आहे. यामुळे मराठी चित्रपटांना जागतिक पातळीवर नवे दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील टप्पा काय असेल याकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews