इम्रान हाशमी आणि यामी गौतम यांचा आगामी कोर्टरूम ड्रामा ‘हक़’ प्रदर्शित होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शाह बानो यांची मुलगी आणि कायदेशीर वारसदार सिद्दीका बेगम यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना “चित्रपटाचे प्रकाशन, प्रदर्शन, प्रचार किंवा रिलीज तत्काळ थांबवावे” अशी मागणी करत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
काय आहे आरोप
या नोटीसमध्ये सिद्दीका बेगम यांनी “दिवंगत शाह बानो बेगम यांच्या वैयक्तिक जीवनाचे त्यांच्या वारसदारांच्या संमतीशिवाय अनधिकृत चित्रण केले गेले” असा आरोप केला आहे. ही नोटीस चित्रपटाचे दिग्दर्शक सुपर्ण वर्मा, निर्माते जंगली पिक्चर्स आणि बावेजा स्टुडिओज यांच्यासह केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला (CBFC) देखील पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘हक़’ हा 1985 मधील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम या प्रकरणावर आधारित आहे. या प्रकरणाने भारतातील महिलांच्या हक्कांसाठी आणि भरण-पोषण कायद्यांसाठी नवीन दिशा दिली होती.
1978 मध्ये, 62 वर्षीय शाह बानो यांनी आपल्या घटस्फोटित पती मोहम्मद अहमद खान जे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत वकील होते. यांच्याकडून भरण-पोषणाची मागणी करत इंदूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. दोघांचा विवाह 1932 मध्ये झाला होता आणि त्यांना तीन मुले आणि दोन मुली होती. 1985 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की शाह बानो या भारतीय दंड संहितेच्या कलम 125 अंतर्गत भरण-पोषणासाठी पात्र आहेत. मात्र, त्यानंतरच्या वर्षी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सरकारने हा निर्णय उलथवण्यासाठी नवीन कायदा आणला.
हक मध्ये कोणाकोणाची भूमिका?
सुपर्ण एस. वर्मा दिग्दर्शित ‘हक़’ या चित्रपटात वर्तिका सिंह, दानिश हुसेन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे निर्माते विनीत जैन, विशाल गुरनानी, जूही पारेख मेहता आणि हरमन बावेजा आहेत. हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.






