ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी दरवाजाला कुलूप लावतो, त्याचप्रमाणे ऑनलाईन अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत पासवर्डचा वापर करणे गरजेचे असते. मात्र अलीकडेच समोर आलेल्या १६ अब्ज पासवर्ड लीक झाल्याच्या घटनेमुळे सर्वत्र चिंता पसरली आहे. अशा वेळी घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची गरज आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की Google कडे एक खास टूल आहे जे तुमच्या पासवर्डच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवते आणि पासवर्ड लीक झाल्यास तात्काळ इशारा देते. या टूलचं नाव आहे Google Password Checkup.
Google Password Checkup म्हणजे काय?
जसा एखादा डॉक्टर आपल्या शरीराची तपासणी करतो, त्याचप्रमाणे हे टूल तुमचे सेव केलेले पासवर्ड नियमितपणे “चेकअप” करतं आणि तपासते की तुमचे पासवर्ड कुठल्या डेटा ब्रीचमध्ये (लीकमध्ये) आले आहेत का. जर एखादा पासवर्ड लीक झाला असेल, तर हे टूल तुम्हाला ताबडतोब अलर्ट पाठवतं जेणेकरून तुम्ही वेळेत पासवर्ड बदलू शकता.
हे टूल कधी काम करतं?
हे टूल फक्त तेव्हाच कार्यरत होतं जेव्हा तुम्ही तुमचे पासवर्ड Google Password Manager मध्ये सेव केलेले असतात. जर तुमचे महत्त्वाचे पासवर्ड Google मध्ये स्टोअर असतील, तर हे टूल त्यावर नजर ठेवते आणि धोका जाणवला तर तात्काळ सूचित करते.
Google Password Manager मध्ये पासवर्ड कसे सेव्ह करायचे?
तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर Google Chrome ब्राउझर उघडा.
वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्स (⋮) वर क्लिक करा.
“Passwords and Autofill” किंवा “Password Manager” या पर्यायावर जा.
डाव्या बाजूला Passwords, Checkup, आणि Settings असे पर्याय दिसतील.
पासवर्ड सेव करण्यासाठी Passwords वर जा आणि “Add” वर क्लिक करा.
जर पासवर्ड आधीच सेव केलेले असतील, तर “Checkup” वर क्लिक करू शकता.
हा चेकअप काय माहिती देतो?
Compromised Passwords सेक्शनमध्ये तुम्हाला दिसेल की तुमचा कोणता पासवर्ड लीक झाला आहे का?
हे टूल हे देखील दाखवतं की:
तुम्ही कोणत्या अॅप्ससाठी कमजोर पासवर्ड वापरला आहे,
एकाच पासवर्डचा किती अकाउंट्समध्ये पुनरावृत्ती केली आहे.
मोबाईलवर पासवर्ड कसे तपासायचे?
जर तुम्ही फोनमध्ये पासवर्ड सेव करत असाल, तर:
Settings > Google > Autofill with Google > Password Manager
या मार्गाने जाऊन तुम्ही पाहू शकता की:
तुमचा पासवर्ड लीक झाला आहे का,
कोणता पासवर्ड कमजोर आहे का.





