रेल्वेने (Indian Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला आता आणखी मोठा चाप बसणार आहे. कारण ठरलं आहे ते म्हणजे रेल्वेत मिळणारे जेवण…. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) ने रेल्वेतील जेवणाबाबत नवा नियम जारी केला आहे ज्यामुळे तुम्हाला भूक असो वा नसो रेल्वेचं जेवण हे घ्यावच लागणार आहे. IRCTC ने ट्रेनेच्या तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत नो फूड ऑप्शन” विना जेवण तिकीट बुक करण्याचा पर्याय हटवला असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येतेय. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
खरं तर यापूर्वी ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना “नो मील” वा “नो फूड” हा पर्याय निवडता येत होता. म्हणजेच काय तर त्याला जेवणाची आवश्यकता नाही तो माणूस नो फूड हा पर्याय वापरून स्वतःचे पैसे वाचवत होता. परंतु आता IRCTC च्या वेबसाईटवर हा पर्याय दिसत नाही, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना जेवणासाठी अतिरिक्त 200 ते 300 रुपयांचा खर्च पडू शकतो अशी भीती प्रवाशांना आहे.
प्रवाशांमध्ये नाराजी
रेल्वेच्या (Indian Railway) या निर्णयानंतर प्रवासांमध्ये नाराजीचे आणि संतापाचे वातावरण आहे. अनेकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चीडही व्यक्त केली आहे. तिकीट बुक करताना त्यांना आता माहिती न देताच जेवणाचे पैसे वसूल केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका प्रवाशाने ट्वीट करत म्हटलं मी केवळ 3 तासांसाठी प्रवास करणार आहे. तरीही मला जेवणाच्या पैशासह तिकीट खरेदी करावे लागले. हा सरळ सरळ प्रवाशांचा खिसा कापण्याचा प्रकार आहे.
काय आहे सत्य? Indian Railway
इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, नो फुडचा पर्याय पूर्णपणे हटविण्यात आलेला नाही. तर त्याची जागा फक्त वर खाली झाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, हे जेवण ऑप्ट आऊट करण्याचा पर्याय त्याच पेजवर आहे. थोड व्यवस्थित बघितल्यास हा पर्याय दिसतो. पण प्रवाशांना हा पर्याय लवकर समोर येत नसल्याने नाराजी पसरली आहे. यानंतर लवकरात लवकर हा पर्याय पूर्वीच्या ठिकाणी आणण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.






