मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय?, मग रेल्वेचं ‘हे’ वेळापत्रक वाचा, मेगा ब्लॉक कुठे?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
रविवारी (दिनांक ०७.०९.२०२५) रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा
मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय?, मग रेल्वेचं ‘हे’ वेळापत्रक वाचा, मेगा ब्लॉक कुठे?

Sunday Mega Block – मुबईच्या रेल्वे लोकलबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, रविवारी (दिनांक ०७.०९.२०२५) रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही अडकून पडण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दरम्यान, माटुंगा – मुलुंड अप व डाउन जलद मार्गावर ११.०५ वाजेपासून १५.४५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३६ वाजेपासून १५.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद गाड्या माटुंगा स्थानकापासून मुलुंड दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यानंतरच्या जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

ठाणे येथून ११.०३ वाजल्यापासून दुपारी १५.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या माटुंगा स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येऊन गंतव्यस्थानावर अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दुसरीकडे हार्बर रेल्वेवर सुद्धा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल – वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर ११.०५ वाजल्यापासून १६.०५ वाजेपर्यंत (पोर्ट लाईन वगळून) मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून १०.३३ वाजल्यापासून १५.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गवरील गाड्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.४५ वाजल्यापासून १५.१२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

पनवेल येथून ११.०२ वाजल्यापासून १५.५३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या तसेच ठाणे येथून १०.०१ वाजल्यापासून १५.२० वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील. तसेच ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध राहील. ब्लॉकच्या कालावधीत पोर्ट मार्गावर सेवा उपलब्ध राहील. ब्लॉकदरम्यान, प्रवाशांनी सहकार्य करावे, असं रेल्वेनं आवाहन केलं आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews