मुंबई- आपल्या दैनंदिन नापरातील प्लास्टिक आता जीवघेणे ठरु लागले आहे. वातावरणातून मानवाच्या शरीरात प्लास्टिकचा प्रवेश होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्लास्टिक आता आपल्या मेंदूपर्यंत पोहचतंय.
दैनंदिन जगण्यातील ताट, वाट्या, पेले आता प्लास्टिकमध्ये रुपांतरीत झालेत.काळाच्या ओघात झालेला हा बदल आता मानवाला घातक ठरताना दिसतोय. दररोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये गेल्या काही काळात वाढ झाली आहे.
प्लास्टिकच्या साधनांमधून अनेक जणं पाणी पितात,अन्नपदार्थ खातात, मात्र आता हेच प्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करतयं. मायक्रो किंवा नॅनो प्लास्टिकच्या स्वरूपात प्लास्टिकचा शरीरातील प्रवेश जेवघेणा ठरतोय.
मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव
जागतिक दर्जाच्या ‘नेचर’ या जर्नलमध्ये मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं संशोधन छापून आलंय.
मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्याने मेंदूशी संबंधित डिमेन्शिया,अल्झायमर्स,स्मृतिभ्रंश यासारखे आजार होण्याचा धोका कैकपटीने वाढलाय.
मानवी शरीरात जीवघेणं प्लास्टिक
कुठल्या माध्यमातून मानवी शरिरात प्लास्टिकचा प्रवेश होतोय, तेही पाहूयात..
१. शरीरात प्रवेश करणाऱ्या प्लास्टिकचा आकार एक नॅनोमिटर पेक्षाही कमी
२. शरीरात प्रवेश करणारं प्लास्टिक डोळ्यांना दिसत नाही
३. नॅनो प्लास्टिकचा जमीन, पाणी आणि वातावरणातून शरीरात प्रवेश
४. भाज्या आणि फळांच्या सेवनातून जातंय प्लास्टिक शरीरात
५. प्लास्टिकच्या कप, ग्लासच्या वापराचाही परिणाम
६. समुद्राच्या पाण्यात 24 लाख ट्रीलियन मायक्रो प्लास्टिक
७. समुद्रातील माशांच्या माध्यमातून मानवी शरीरात प्लास्टिक
मेंदूत प्लास्टिक वाढतंय
2016 आणि 2024 मध्ये मृत झालेल्या काही व्यक्तींच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला. यात 2016 च्या तुलनेत 2024 मध्ये मृत झालेल्यांच्या मेंदूत प्लास्टिकचे प्रमाण 50 टक्के अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. शरीरात हे प्लास्टिक कसं जातंय हेही जाणून घेऊयात.
मानवी शरीरात कसं शिरतंय प्लास्टिक?
1. एक लिटरच्या प्लास्टिक बॉटलमधून वर्षभरात 2 लाख 40 हजार मायक्रो प्लास्टिक शरीरात
2. अमेरिकेतील संशोधनात मिठाच्या 39 ब्रँड पैकी 36 ब्रँडमध्ये मायक्रो प्लास्टिक
३. मेंदूमध्ये मायक्रो प्लास्टिक जमा झाल्यास पक्षाघाताचा धोका अधिक
प्लास्टिकचा वापर कमी करण्याची गरज
दैनंदिन जीवनातून प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यासाठी सरकारसोबत सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्यास आता तज्ज्ञ सांगतायेत. आजच्या घडीला प्लास्टिकमुक्त जीवन शक्य आहे का हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून जनजागृती करणं आवश्यक आहे.प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणं ही केवळ पर्यावरणापुरती मर्यादित नाही तर आरोग्याची गरज ठरतेय. भावी पिढ्यांना प्लास्टिकच्या धोक्यातून वाचवायचं असेल तर आत्तापासूनच प्लास्टिकचा वापर कमी करण्याची गरज आहे.





