जगभरातील आणि भारतातील प्रदूषित पिण्याच्या पाण्याची समस्या ही गंभीर आरोग्य आणि सामाजिक आव्हान ठरली आहे. औद्योगिक कचरा, रासायनिक पदार्थ, कीटकनाशके आणि सांडपाणी यामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो. या दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड, अतिसार, हिपॅटायटिस यांसारखे जलजन्य रोग वेगाने पसरतात. भारतात गंगा, यमुना, गोदावरीसारख्या नद्यांचे प्रदूषण ही चिंतेची बाब आहे. सुरक्षित पाणीपुरवठा, शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा वापर आणि जनजागृती हे उपाय या समस्येवर मात करण्यासाठी अत्यावश्यक ठरतात. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांचा जगातील दूषित पाण्याच्या बाबतीत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
जगातील 210 कोटी लोक पितात दूषित पाणी
संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. जगभरातील तब्बल 210 कोटींहून अधिक लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नाही. प्रत्येक चारमधील एक व्यक्तीला दुषित पाणी पिणे भाग पडत आहे. मागील वर्षात जगात ही परिस्थिती होती. दहा कोटींपेक्षा जास्त लोक पिण्याच्या पाण्यासाठी नद्या, तलावांवर अवलंबून आहेत. स्वच्छता आणि आरोग्य सेवांत पिछाडीवर पडल्यामुळे अब्जावधी लोक आजारांच्या विळख्यात अडकले आहेत. या समस्येवर जगभरातच लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, 2030 पर्यंत याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल याची शक्यता कमीच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पर्यावरण प्रमुखे रुडिगर क्रेच यांनी सांगितले की पाणी, स्वच्छता आणि सफाई विशेषाधिकार नाही तर मुलभूत मानवाधिकार आहेत.
दूषित पाण्यापासून स्वत:ची काळजी घ्या!
दूषित पाण्यापासून स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण यामुळे अनेक गंभीर जलजन्य रोग उद्भवतात. नेहमी उकळलेले किंवा शुद्धीकरण केलेले पाणीच प्या. घरी पाण्याचे फिल्टर, आरओ किंवा उकळण्याची पद्धत वापरा. उघड्यावर ठेवलेले किंवा साठवलेले पाणी वापरताना स्वच्छ भांडे वापरा आणि ते झाकून ठेवा. पावसाळ्यात किंवा प्रवासादरम्यान पॅकबंद पाणी पिणे सुरक्षित असते. पाण्याचे साठवण करताना स्वच्छतेची काळजी घ्या व वेळोवेळी भांडी धुवा. मुलांना व वृद्धांना विशेष काळजीची गरज असते. दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर हा सर्वोत्तम उपाय आहे.






