गेल्या काही काळापासून मतदार ओळखपत्र (वोटर आयडी) आणि मतदार यादीचा मुद्दा चर्चेत आहे. बिहारमध्ये मतदार यादी पुनरावलोकन (Revision SIR) नंतर विरोधकांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप लावले होते. यामध्ये विरोधी नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर आधी नावं हटवल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर त्यांचे स्वतःचे दोन EPIC क्रमांक (EPIC नंबर) आढळले, ज्यामुळे त्यांच्यावर चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात तेजस्वी यादव यांच्याकडून माहिती मागवली आहे.
चला जाणून घेऊया, EPIC नंबर म्हणजे काय? तो कसा जारी केला जातो? आणि प्रत्येक राज्यात तो वेगळा का असतो?
EPIC नंबर म्हणजे काय?
EPIC नंबर म्हणजेच Electors Photo Identity Card नंबर हा मतदार ओळखपत्रावर असलेला 10 अंकी अल्फा-न्युमेरिक क्रमांक असतो. जसा आधार कार्डवर एक यूनिक नंबर असतो, तसाच EPIC नंबर प्रत्येक मतदारासाठी वेगळा असतो. हा क्रमांक भारत निवडणूक आयोगाकडून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना दिला जातो. हा एक ओळखपत्राचा महत्त्वाचा भाग असून, तो मतदार म्हणून ओळख पटवण्यासाठी वापरला जातो.
EPIC नंबर कसा दिला जातो?
EPIC नंबर मिळवण्यासाठी नागरिकांनी प्रथम मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते. त्यासाठी फॉर्म-6 भरावा लागतो. हा फॉर्म भरल्यानंतर भारत निवडणूक आयोग संबंधित व्यक्तीस EPIC नंबरसह मतदार ओळखपत्र जारी करतो. EPIC नंबर मतदार ओळखपत्रावर स्पष्टपणे लिहिलेला असतो. जर मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल, तर NVSP (National Voters’ Service Portal) या अधिकृत पोर्टलवर जाऊन EPIC नंबर पाहता येतो.
EPIC नंबर प्रत्येक राज्यात वेगळा का असतो?
EPIC नंबर हा प्रत्येक मतदारासाठी युनिक (एकमेव) असतो. त्यामुळे तो प्रत्येक राज्यात – आणि देशभरातही – वेगवेगळा असतो. या नंबरद्वारे मतदार यादीतील माहिती तपासणे, ओळखपत्रातील माहिती दुरुस्त करणे आणि निवडणूक संबंधित इतर सेवांचा लाभ घेता येतो. EPIC नंबरच्या आधारे केंद्र व राज्य सरकार मतदार यादीचे व्यवस्थापन करतात.





