उद्या पुणे शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत काही तांत्रिक कामं केली जाणार आहे. या कामांसाठी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
दुरूस्तीच्या कामांमुळे निर्णय
वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पाण्याच्या टाक्यांना (उदा. बालेवाडी जकात नाका टाकी, सन हॉरिझोन टाकी, बाणेर वेस्ट टाकी इत्यादी) नवीन जलवाहिन्या जोडल्या जाणार आहेत आणि नवीन व्हॉल्व्ह (वॉल्व्ह) बसवले जाणार आहेत. तसेच भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेत पाणी वितरणातील काही त्रुटी दूर करण्यासाठी चाचणी घेतली जाणार आहे. या कामांमुळे पाणीपुरवठा खंडित होईल. शुक्रवारी, 13 जून रोजी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल.
‘या’ भागातील पाणीपुरवठा प्रभावित
गुरुवारी 12 जून रोजी शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. कोथरुड, बाणेर, बालेवाडी, वारजे, विमाननगर, पाषाण आणि इतर काही भागांत नवीन जलवाहिन्या जोडण्याचे काम आणि भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत पाणी वितरणातील त्रुटी दूर करण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे या अर्ध्या शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर: पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी आणि डावी भुसारी कॉलनी (चढावरील भाग), चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरजनगर, सागर कॉलनी, भारती नगर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्करखिंड परिसर, शास्त्रीनगर, व्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहननगर, सुस रोड, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सुस या भागातील पाणीपुरवठा प्रामुख्याने प्रभावित होणार असल्याची माहिती आहे.
पाणी जपून वापरण्याचं आवाहन
पुणे महानगरपालिकेने वर दिलेल्या प्रभावित भागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. नवीन जलवाहिन्या जोडण्याचे आणि पाणी वितरणातील त्रुटी दूर करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शुक्रवारी 13 जून रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने सूरू होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.





