नवी दिल्ली– भारतातील एकमेव अशी संस्था आहे, ज्या संस्थेनं 5 लाख 75 हजार किलो सोनं खरेदी केलंय. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे. हा कोणत्याही ज्वेलर्स किंवा सराफा व्यापाऱ्यांचा समूह नाही, ना कुणी उद्योगपतीची संस्था आहे. तर देशाच्या केंद्रीय बँकेनं या सोन्याची खरेदी केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2024-25 या वर्षांत सोन्याच्या राखीव साठ्यात 57.5 टननं भर घातली आहे. यामुळे 31 मार्च 2025 पर्यंत सिझर्व्ह बँकेच्या एकूण सोन्याचा राखीव साठा 879.58 टन इतका झाला आहे. आरबीआयनं 2024-25 च्या वार्षिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या एकूण सोन्याच्या राखीव साठ्यात 7 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी हा साठा 822.10 टन इतका होता.
आरबीआय का करतं सोन्याची खरेदी?
भारतीय रिझर्व्ह बँक दरवर्षी सोन्याची खरेदी करते. विदेशी मुद्रा भंडारात विविधता आणण्यासाठी आणि रुपयाच्या चढ-उतारात स्थिरता आणण्यासाठी तसचं आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी ही सोने खरेदी करण्यात येते.
सोनं ही एक सुरक्षित संपत्ती आजही जगभरात मानण्यात येते. महागाई, युद्ध, भूकंपासारख्या परिस्थितीत जोखीम असताना बचावासाठी या सोन्याचा उपयोग होऊ शकतो. सोनं खरेदी केल्यानं केंद्रीय बँकेची आर्थिक स्थिरताही वाढीस लागते. देशाच्या मजबूत आर्थिक स्थितीशी या सोन्याच्या साठ्याचा एका अर्थी संबंध असल्याचं मानण्यात येतं.
7 लाख कोटींपर्यंत पोहचलं राखीव सोनं
आरबीआयमध्ये असलेल्या सोन्याच्या साठ्याची किंमत 52.09 टक्क्यांनी वाढली आहे. 4.39 लाख कोटींवरुन ही किंमत आता 6.68 लाख कोटींपर्यंत पोहचली आहे. बँकिंग विभागात ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या मूल्यात 57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे सोनं 2.74 लाख कोटींहून 4.31 लाख कोटींपर्यंत पोहचलं आहे.
देशांतर्गत आणि परदेशातील गुंतवणुकीत झालेल्या वाढीसोबतच सोन्याच्या साठ्यामुळे आरबीआयच्या एकूण बॅलन्स शीटमध्ये 8.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. 2025 साली हा आकडा 70.47 लाख कोटींवरुन आता 76.25 लाख कोटींपर्यंत पोहचला आहे.
जगातील आर्थिक स्थिरता असणाऱ्या देशांसाठी सोन्याचा साठा हा अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. आपल्या देशाच्या सोन्याच्या साठ्यात होत असलेली ही वाढ सकारात्मक असल्याचं मानण्यात येतंय.





