Marathi News

Winter Season: महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पारा 12°C पर्यंत घसरला; सर्वदूर थंडीचा कडाका !

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तरेकडून शीतलहरींचा प्रभाव कायम असल्याने उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढत आहे.
Winter Season: महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पारा 12°C पर्यंत घसरला; सर्वदूर थंडीचा कडाका !

उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्रात येवू लागल्याने गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून असल्याने हुडहुडी कायम आहे. आज 14 नोव्हेंबर रोजी राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळातील हे वातावरण पिकांसाठी जरी पोषक असले तरी नागरिकांना मात्र आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा गारठला !

पुणे जिल्ह्यात गुरुवारी 30.2 कमाल आणि 13.7 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. आज पुणे जिल्ह्यातील कमाल तापमान 30 अंशावर राहील. तसेच किमान तापमान पारा 12 अंशांवर राहणार असल्याने पुण्यात थंडीचा जोर कायम राहणार आहे. साताऱ्यात गारठा वाढत असून धुक्यासह दव पडत आहे. गुरुवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 31.1 अंशावर राहिला. तर 15 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात अंशत वाढ होऊन 12 आणि 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल.

अशीच काहीशी परिस्थिती मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे, उत्तरेकडून शीतलहरींचा प्रभाव कायम असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढत आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेला अक्षरशः धुके दाटले जात असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि बीड जिल्ह्यांत सामान्यतः निरभ्र आकाश राहील. हवेतील आर्द्रता कमी झाली असून. वातावरण अधिक कोरडे होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असू शकते. इतर जिल्ह्यांतही कमी अधिक फरकाने अशीच परिस्थिती असणार आहे.

थंडीत आरोग्याची काळजी अशी घ्या!

कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews