चॅटजीपीटी तयार करणारी कंपनी ओपनएआय (OpenAI) एका नव्या प्रोडक्टवर काम करत असल्याची चर्चा आहे. हे प्रोडक्ट कोणतेही अॅप किंवा सॉफ्टवेअर नसून हार्डवेअर डिव्हाइस असणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सध्या स्मार्ट पेन विकसित करत आहे.
ओपनएआय गेल्या काही काळापासून या हार्डवेअर प्रोजेक्टवर काम करत असून, या प्रोडक्टला कंपनीच्या आतल्या वर्तुळात “गमड्रॉप” (Gumdrop) असे कोडनेम देण्यात आले आहे. मात्र, या संदर्भात ओपनएआयकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
तरीसुद्धा, या संभाव्य स्मार्ट पेनबाबत तंत्रज्ञानप्रेमींमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा वाढत चालल्या आहेत. ओपनएआय या नव्या प्रोडक्टमधून नेमके काय खास देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
साधारण पेनसारखा दिसणाऱ्या या डिव्हाइसामध्ये थक्क करून सोडणारे फीचर्स मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, या स्मार्ट पेनने घेतलेले नोट्स लगेच डिजिटल टेक्स्टमध्ये रूपांतरित करता येतील.
यामध्ये ऑडिओ फीचर देखील असणार असून, तुम्ही बोललेले शब्द हे पेन डिजिटल स्वरूपात नोंदवू शकेल. याशिवाय, या डिव्हाइसला व्हॉइस असिस्टंटने सुसज्ज करण्याची तयारी सुरू आहे.
या स्मार्ट पेनची सर्वात खास बाब म्हणजे ते थेट चॅटजीपीटीशी कनेक्ट करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही बोलाल किंवा लिहाल, ते चॅटजीपीटी वाचून आपोआप नोट्स तयार करू शकेल. एवढेच नाही तर त्या टेक्स्टचे सारांश (समराइज) तयार करणे आणि पुन्हा लिहिणे (रिराइट) देखील शक्य होईल.
विशेष म्हणजे, हे सगळे काम कोणत्याही मोबाइल किंवा लॅपटॉपशिवाय करता येणार असल्याने हे स्मार्ट पेन तंत्रज्ञानाच्या जगात मोठा बदल घडवू शकते.
ॲपलची सप्लायर कंपनी करणार प्रोडक्शन
या स्मार्ट पेनच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी ओपनएआयने सुरुवातीला लक्सशेयर (Luxshare) या कंपनीसोबत चर्चा केली होती. मात्र, प्रोडक्शन कुठे करायचे यावरून दोन्ही कंपन्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही.
आता मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन आणि इतर लोकप्रिय गॅजेट्स तयार करणारी फॉक्सकॉन (Foxconn) ही कंपनी या स्मार्ट पेनचे प्रोडक्शन करणार असल्याची शक्यता आहे. फॉक्सकॉन ही ॲपलची मोठी सप्लायर कंपनी असल्याने, या प्रोजेक्टला अधिक महत्त्व मिळत असल्याचे मानले जात आहे.
ओपनएआयसाठी मोठे आव्हान
या नव्या डिव्हाइसच्या बाबतीत ओपनएआयसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. यापूर्वीही Rabbit R1 आणि Humane AI Pin यांसारखी अनेक स्क्रीन-फ्री डिव्हाइस बाजारात लॉन्च झाली होती, मात्र त्यापैकी कोणतेही डिव्हाइस खास प्रभाव पाडू शकले नाही.
अशा परिस्थितीत, ओपनएआयसमोर आपले ‘गमड्रॉप’ स्मार्ट पेन केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षमच नव्हे, तर प्रत्यक्ष वापरासाठी उपयुक्त (प्रॅक्टिकल) आणि ग्राहकांना आकर्षित करणारे बनवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.




