Rava Ladoo Recipe In Marathi: घराघरात दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीमध्ये कपडे खरेदी करण्यापासून ते घराच्या सजावटीपर्यंत अनेक कामामध्ये लोक व्यग्र आहेत. तर घरच्या महिलांना फराळाचे वेध लागले आहेत. दिवाळीत फराळ आवर्जून केला जातो. महिला फराळात तिखट, नमकीनपासून गोडापर्यंत अनेक पदार्थ बनवतात. तर काही महिला पदार्थ जमत नाहीत किंवा कामाच्या व्यापात करता येत नाहीत म्हणून बाहेरून फराळ विकत आणतात.
परंतु अनेक महिलांना फराळ घरी करायचा तर असतो पण त्यांना काही पदार्थ योग्य जमत नसल्याने त्या नाराज होतात. यामध्ये रव्याच्या लाडूंचासुद्धा समावेश होतो. फराळात अनेक प्रकारचे लाडू बनवतात. यामध्ये पारंपरिक रव्याच्या लाडूचा समावेश होतो. रव्याचे लाडू फार काळजीपूर्वक करावे लागतात नाहीतर ते कडक होतात किंवा वळताच येत नाहीत. त्यामुळेच रव्याचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत आपण जाणून घेऊया……
रव्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
बारीक रवा- २ कप
साजूक तूप-अर्धा कप
पिठीसाखर- १ कप
वेलची पूड- १/२ टीस्पून
ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, बेदाणे)- आवडीनुसार
दूध- (गरज वाटल्यास)
रव्याचे लाडू बनवण्याची रेसिपी-
रव्याचे लाडू बनवताना रवा चांगला भाजणे गरजेचे असते. शिवाय त्यामध्ये गुठळ्या होऊ देऊ नका. नाहीतर लाडू वळताना तुटतात.
रव्याचे लाडू बनवताना सर्वप्रथम एक कढई गरम करून त्यात तूप घालून गरम करा.
तूप गरम होतच त्यामध्ये रवा घाला. रवा चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.
रवा भाजताना सतत ढवळत राहा जेणेकरून तळाला लागणार नाही.
तसेच तुपात काजू, बदाम, मनुके चांगले भाजून घ्या.
आता रवा एका परातीमध्ये काढून त्यात सर्व ड्रायफ्रूट्स घालून, वेलची पूड आणि पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या.
मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ नका. कोमट असतानाच त्यामध्ये गरजेनुसार थोडे-थोडे दूध घालून लाडू वळून घ्या.
आता तयार लाडूवर ड्रायफ्रूट्स लावून हवाबंद डब्यात भरून ठेवा.






