देशभरात हार्ट अटॅकच्या (हृदयविकाराच्या) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः तरुणांमध्ये ही समस्या चिंतेचा विषय ठरत आहे. बदललेली जीवनशैली, तणाव, चुकीचे आहार, वजन, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान–दारू यांसारख्या सवयी यामुळे हृदयविकाराचा धोका प्रचंड वाढला आहे. कोविडनंतर अनेकांना क्लॉटिंगसारख्या समस्यांमुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हृदय निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्सचा अवलंब करणे आवश्यक आहे.
नियमित व्यायाम करा
सर्वप्रथम, नियमित व्यायाम हा हृदयासाठी सर्वोत्तम उपाय आहे. दररोज किमान ३० मिनिटांचा चालण्याचा व्यायाम, सायकलिंग, पोहणे किंवा योगसाधना केल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. विशेषतः धावणे (जॉगिंग) किंवा झपाट्याने चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यासोबतच, योग आणि प्राणायाम हे तणाव कमी करतात आणि हृदयाच्या ठोक्यांचा संतुलन राखतात.
संतुलित-पौष्टिक आहार
संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. अधिक तेलकट, तूपकट, साखरयुक्त पदार्थ टाळा. त्याऐवजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त अन्न (जसे की अक्रोड, फिश) यांचा आहारात समावेश करा. मीठाचे प्रमाण कमी ठेवा कारण जास्त मीठ रक्तदाब वाढवते आणि हृदयावर ताण निर्माण करते.
धुम्रपान,मद्यपान टाळा
धूम्रपान आणि मद्यपान पूर्णतः टाळा. हे दोन्ही पदार्थ रक्तवाहिन्यांवर परिणाम करतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात. धूम्रपानामुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह बिघडतो. अल्कोहोलमुळेही हृदयाच्या पेशींवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे निरोगी हृदयासाठी धुम्रपान आणि मद्यपान सक्तीने टाळणे आवश्यक आहे.
ताण-तणावाचे व्यवस्थापन
तणावाचे व्यवस्थापन करणे ही अजून एक महत्त्वाची बाब आहे. सततचा मानसिक तणाव हृदयावर ताण निर्माण करतो. मेडिटेशन, ध्यानधारणा, संगीत ऐकणे किंवा मनाला शांत ठेवणाऱ्या क्रियाकलापांत सहभागी होणे हे तणाव कमी करण्यात मदत करतात. कुटुंब व मित्रांबरोबर वेळ घालवणे, निसर्गात फेरफटका मारणे हेही फायदेशीर ठरते. झोपेची योग्य मात्रा देखील हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. दररोज किमान ७–८ तासांची झोप आवश्यक असते. अपुरी झोप ही रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचे प्रमुख कारण ठरू शकते.
शेवटी, नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. रक्तदाब, कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हृदयाचे कोणतेही लक्षण (उदा. छातीत दुखणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास) दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.सर्वसाधारणपणे, योग्य आहार, नियमित व्यायाम, सकारात्मक जीवनदृष्टी, व्यसनमुक्ती आणि मानसिक शांतता या गोष्टी अंगीकारल्यास हृदय निरोगी, मजबूत व दीर्घायुषी राहते. बदलत्या काळात हृदयाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.






