मुंबई- राजकारणात कुणीच कायमचा शत्रू नसतो, तसाच कुणीच कायमचा मित्र देखील नसतो… अंबरनाथ नगरपालिकेत जे काही घडतंय, त्यामुळं याचाच प्रत्यय आलाय… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं चक्क काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्तेचा डाव हाती घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या निलंबित 12 नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन अंबरनाथची सत्ता काबीज करण्याचा खटाटोप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी केला.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना 27 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. तर भाजपला 14 जागा मिळाल्या. मात्र भाजपनं सत्ता काबीज करण्यासाठी थेट काँग्रेसच्या 12 नगरसेवकांशी घरोबा केला. या भाजप-काँग्रेस युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या पुढाकारानं काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला.
अंबरनाथमध्ये ‘बदला’पूर पॅटर्न
भाजपचे विजयी 14 नगरसेवक, नव्याने भाजपात आलेले काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे 4 असं 30 चं संख्याबळ जमवण्यात आलं. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अशी राजकीय खेळी केली की, भाजपवरच चेकमेट होण्याची वेळ आली. त्यांनी गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना आपल्यासोबत घेतलं. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेचे 27 नगरसेवक अधिक राष्ट्रवादीचे 4 आणि अपक्ष 1 असं 32 चं संख्याबळ जमवून भाजपवर कुरघोडी केली
नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना
अंबरनाथमधील सत्ता स्थापन करण्याच्या या राजकारणानंतर शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीचे नगरसेवक बसमधून अज्ञातस्थळी रवाना झालेत. अंबरनाथ नगरपालिकेची एकूण सदस्यसंख्या ५९ असून बहुमतासाठी ३० हा जादूचा आकडा आवश्यक आहे. अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानं सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे गेल्यात. मात्र या घडामोडींचा महायुतीवर परिणाम होणार नाही, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय.
अंबरनाथचं समीकरण बदललं
शिंदेंच्या एका खेळीने अंबरनाथचे संपूर्ण समीकरणच बदलून गेलंय. केवळ अंबरनाथच नाही, तर यामुळं ठाणे जिल्ह्यातलं राजकीय समीकरण बदलणार आहे. अंबरनाथमधील या ‘ट्विस्ट पे ट्विस्ट’ने हे सिद्ध केलंय की, महायुतीत जरी वरून सर्व आलबेल दिसत असलं, तरी स्थानिक पातळीवर सत्तेसाठी ‘काँटे की टक्कर’ सुरू आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला दिलेला हा शह म्हणजे अंबरनाथमधला बदलापूर पॅटर्न असल्याची चर्चा राजकारणात रंगलीय.





