Marathi News

पीएमपीच्या ताफ्यात 12 हायड्रोजन बसेस दाखल होणार; पुणेकरांचा प्रवास होणार पर्यावरणपूरक

Written by:Rohit Shinde
Published:
पुणे शहरातील हायड्रोजन बसेसची चाचणी पूर्ण झाल्यानंतर अथवा चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या बसच्या वापरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे प्रस्ताव देण्यात येणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 12 हायड्रोजन बसेस दाखल होणार; पुणेकरांचा प्रवास होणार पर्यावरणपूरक

पुणेकरांचा प्रवासा आता पर्यावरणपूरक होणार आहे. पुण्यात हायड्रोजन इंधनावरील बसची चाचणी सुरू झाली आहे. ‘महाऊर्जा’ आणि ‘पीएमपी’च्या पुढाकाराने ही बस पुढील सात दिवस शहरात फिरणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास सार्वजनिक वाहतुकीत या पर्यावरणपूरक बसचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आगामी काही काळात ही चाचणी पूर्ण झाल्यावर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता यामुळे निर्माण होत आहे.

लवकरच 12 हायड्रोजन बसेस धावणार!

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानांतर्गत हायड्रोजन इंधनावरील बसची चाचणी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण कार्यालयाच्या आवारात बुधवारी पार पडली. पुढील सात दिवस शहरातील विविध भागांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या बसच्या वापरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे प्रस्ताव देण्यात येणार आहे.

12 बसची निर्मिती करण्यात आली आहे. या बस इंडियन ऑइलने विकत घेतल्या आहेत. देशात सध्या दिल्ली आणि बडोदा येथे महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी या बस वापरल्या जात आहेत. पुण्यातील चाचणीसाठी बडोदा येथून बस आणण्यात आली आहे. महाऊर्जा, पीएमपी, टाटा मोटर्स आणि इंडियन ऑइल यांच्यावतीने औंध येथील रस्त्यावर या बसची चाचणी घेण्यात आली.

हायड्रोजन बसेसचा पर्यावरणाला फायदा

हायड्रोजन बसेस पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. या बसेसमध्ये इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर केला जातो, ज्यामुळे कार्बन डायऑक्साइड किंवा इतर हानिकारक वायूंचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे हवेचे प्रदूषण कमी होते आणि शहरी भागातील हवेची गुणवत्ता सुधारते. हायड्रोजन बस चालवण्यासाठी लागणारे इंधन पुनर्नवीकरणीय उर्जेतून मिळवता येते, त्यामुळे जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होते. या बसेस शांतपणे चालतात, त्यामुळे ध्वनी प्रदूषणही कमी होते. एकूणच हायड्रोजन बसेस शहरांना स्वच्छ, हिरवे आणि टिकाऊ भविष्य देण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews