Marathi News

Maharashtra Elections 2026 : राज्यातील महापालिकांमध्ये 98 टक्के महापौर महायुतीचेच, मुख्यमंत्र्यांचा दावा काय आहे? युती-आघाड्यांबाबत म्हणाले..

Written by:Smita Gangurde
Published:
नागपुरात 'तर्री पोहे विथ देवाभाऊ' या नावानं रंगलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांनंतरच्या निकालांबाबत मोठा दावा केला आहे.
Maharashtra Elections 2026 : राज्यातील महापालिकांमध्ये 98 टक्के महापौर महायुतीचेच, मुख्यमंत्र्यांचा दावा काय आहे? युती-आघाड्यांबाबत म्हणाले..

Maharashtra Municipal Corporation Election – राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचलेला आहे. मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे युती विरुद्ध काँग्रेस-वंचित आघाडी असा संघर्ष रंगलेला आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखती एका बाजूला सुरु असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम राज्यभरातील मोठ्या शहरांमध्ये होतायेत. नागपुरात ‘तर्री पोहे विथ देवाभाऊ’ या नावानं रंगलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांनंतरच्या निकालांबाबत मोठा दावा केला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे यांनी ही मुलाखत घेतली.

राज्यात 27 महापालिकांत महायुतीचे महापौर

राज्यात 29 पैकी 27 महापालिकांत महायुतीतील मित्रपक्षांचे महापौर होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजपा काही ठिकाणी एकत्र तर काही महापालिकांत स्वतंत्र लढते आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं वेगळी चूल मांडलेली आहे. महापालिका निवडणुकांत जरी तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी निकालानंतर महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महापालिकांवर सत्ता मिळवतील, असे संकेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.

ठाकरे शिवसेना, मनसेशी निकालांनंतर हातमिळवणी नाही?

अंबरनाथ आणि अकोटमध्ये भाजपानं सत्तेसाठी काँग्रेस, एमआयएमसारख्या पक्षांशी निकालापश्चात युती केली होती. त्यावरुन जोरदार टीकाही झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अनैसर्गिक युती होणार नाही आणि ज्यांनी सत्तेसाठी अशा युत्या, आघाड्या केल्या असतील अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी थेट भाजपात प्रवेश केलाय. आता हा अंबरनाथ पॅटर्न महापालिका निवडणुकांनतरही अनेक ठिकाणी राबवला जाण्याची शक्यता आहे.

यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणुकांच्या आधी महायुतीव्यतिरिक्त असलेल्या विरोधकांशी हातमिळवणी होणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलंय. म्हणजेच काँग्रेस, एमआयएमसह ठाकरे शिवसेना आणि मनसेशी महापालिका निवडणुकांनंतर सत्तेसाठी भाजपा युती करणार नाही, असं दिसतंय. मात्र असं असलं तरी इितर पक्षांतील नगरसेवक फोडून त्यांना थेट भाजपात प्रवेश करवून घेण्याचा पर्याय भाजपासमोर असणारच आहे.

अजित पवार महायुतीतच राहतील

अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यांच्या पक्षांची पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसाठी युती झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील जवळीक वाढत असताना दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चाही जोरात सुरुय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार हे 2029 च्या निवडणुांनंतरही महायुतीतच राहतील असं विधान दुसऱ्या एका मुलाखतीत केलंय. त्यामुळे शरद पवार एनडीएत येणार का, असा सवाल उपस्थित होतोय.

अजित पवार आणि भाजप यांच्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार संघर्ष होतोय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. यामुळं दोन्ही पक्षांत कटुता आल्याचं मानलं जात असताना मुख्यमंत्र्यांचं हे विधान महायुती अबाधित राहील हेच दर्शवणारं आहे.

Follow Us :GoogleNews