Devendra Fadnavis : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु आहे. दुसरीकडे पिक उत्पादन वाढीसाठी चांगले बी बियाणे खरेदी करण्याकडे कल शेतकऱ्यांचा असतो. मात्र अनेक वेळा त्यांचा भ्रमनिराश होतो. दरम्यान, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झालाय. राज्यातील कृषी विद्यापिठांनी पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र कृषी शिक्षण तसेच संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
बदलत्या तंत्राचा वापर शेतीत वाढवावा लागेल…
संरक्षित शेतीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वातावरणीय बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभा राहिली आहेत. बदलत्या तंत्राचा वापर करत गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागणार आहे. वातावरणीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या पावसातील खंड सारख्या संकटात तग धरू शकेल, असे वाण विकसित करावे लागणार आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले.
तग धरू शकणाऱ्या वाणाचे संशोधन व्हावे…
दुसरीकडे कीड व्यवस्थापन, पावसाचा खंड, वातावरणीय बदलात पावसाचा खंड आदी संकटात तग धरू शकणारे वाण विकसित करण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान, वातावरणीय बदल, कीड व्यवस्थापन, तसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.





