Marathi News

मुंबई शहर आणि उपनगरांतील ईद-ए-मिलादच्या सुट्टीबाबत मोठी अपडेट; 5 ऐवजी 8 सप्टेंबरला असणार सार्वजनिक सुट्टी

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई शहर आणि उपनगरांतील ईद-ए-मिलादच्या सुट्टीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. ही सुट्टी खरंतर 5 ऐवजी 8 तारखेला असणार आहे. याबाबत अधिक जाणून घेऊ...
मुंबई शहर आणि उपनगरांतील ईद-ए-मिलादच्या सुट्टीबाबत मोठी अपडेट; 5 ऐवजी 8 सप्टेंबरला असणार सार्वजनिक सुट्टी

ईद-ए-मिलाद-उन-नबी किंवा ईद मिलादुन्नबी हा दिवस पैगंबर हजरत मुहम्मद साहब यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.  खरंतर जगभरातील आणि भारतातील मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने हा सण तसा अत्यंत महत्वाचा अशा स्वरूपाचा आहे. मात्र मुंबई शहर जिल्हा आणि उपनगरांच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ईद-ए-मिलाद निमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार दि. ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.

सुट्टीच्या तारखेत बदल; निर्णय जाहीर

शनिवार दि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू – मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे नागरिकांना आता सार्वजनिक सुट्टीतील तारखेच्या बदलाबाबत नोंद घ्यावी लागणार आहे.

सणामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह

ईद ए मिलाद हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण मानला जातो. हा दिवस प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव एकत्र येऊन मशिदींमध्ये प्रार्थना करतात, कुरआन पठण करतात आणि धर्मोपदेश ऐकतात. समाजात एकोपा, शांती आणि बंधुत्वाचा संदेश दिला जातो. घरोघरी विशेष खाद्यपदार्थ तयार केले जातात आणि गरजू लोकांना मदत केली जाते. सजावट, मशिदींची रोषणाई आणि मिरवणुका या सणाची शोभा वाढवतात. मुस्लिम बांधवांत उत्साह आणि भक्तिभाव दिसून येतो. हा सण धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि मानवी मूल्यांची जाणीव करून देणारा आहे. मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने खरंतर वर्षातील हा दिवस तसा अत्यंत महत्वाचा असतो.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews