नागपूर – विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसीठी भाजपानं कंबर कसलेली आहे. यासाठी वर्ध्यात भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नियोजन मेळावा सोमवारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ही बैठक केवळ रणनीतीसाठी नव्हती, तर आपण मिळवलेल्या जनसमर्थनाच्या बळावर पुढची दिशा निश्चित करण्यासाठी होती. असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकीत विदर्भ भाजपाच्या बाजूने ठाम उभा राहिला, आणि यापुढेही उभा राहील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार-फडणवीस
महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने काम सुरू केल्यापासून अनेक निर्णय घेतले, अनेक योजना राबवल्या, आणि 5 वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलल्याचे आपल्याला दिसेल, याचा पूर्ण विश्वास असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितलं.
विदर्भात सिंचन, शेती, रस्ते, वीज, उद्योग आणि घरे, या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. गडचिरोलीपासून अमरावतीपर्यंत आपण औद्योगिक गुंतवणुकीपासून ते ग्रामीण विकासाच्या प्रत्येक पैलूवर लक्ष केंद्रित केलं आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
विदर्भात महायुती सरकारच्या काळात कोणती कामं?
1. विदर्भातील 20 वर्षांपासून रखडलेल्या 89 सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी
2. वैनगंगा–नळगंगा प्रकल्प : 10 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार
3. 2 लाख कोटींची औद्योगिक गंतवणुकीसह गडचिरोली होणार स्टील सिटी
4. समृद्धी महामार्गामार्फत विदर्भात परिवर्तनाची नांदी
5. अमरावती ‘PM मित्रा’ टेक्स्टाईल हब – 2 लाख रोजगार6. वर्धा आणि इतर भागांमध्ये नव्या औद्योगिक ईकोसिस्टम्सची उभारणी
राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते, सौर कृषी वाहिनी योजनेमार्फत दिवसा वीज, प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत 30 लाख घरांसाठी मंजुरी, 1000 लोकसंख्येवरील गावांना सीमेंट रस्त्यांनी जोडण्याची योजना, हे सर्व प्रकल्प प्रत्यक्ष आकार येऊ लागले आहेत. असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
विरोधकांच्या फेक नरेटिव्हवर टीकास्त्र
विकास हीच रणनीती आहे. मात्र आपले विरोधक विकासाशी स्पर्धा करू शकत नाहीत म्हणून ते ‘फेक नॅरेटिव्ह’ तयार करतात. कधी भाषेवरून, कधी जातीवरून, तर कधी विशेष जनसुरक्षा सारख्या कायद्यावरून. पण जनतेने ठामपणे विश्वास दाखवला आहे तो विकासाच्या बाजूने, भाजपाच्या बाजूने, असंही फडणवीस म्हणाले.
विदर्भात भाजपाचाच झेंडा फडकणार- फडणवीस
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. हा आपल्यासाठी नवा संकल्प आणि विजयाचा निर्धार करण्याचा क्षण आहे, विजयाचा नवीन विक्रम स्थापित करण्याची हीच संधी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. भाजपा ही बजरंगबलीसारखी आहे फक्त आपली शक्ती जागृत करण्याची गरज आहे. हेच बळ आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजयासाठी वापरायचे आहे आणि विदर्भात भाजपाचा भगवा फडकवायचा आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत





