Marathi News

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Written by:Astha Sutar
Published:
डॉ.विजय पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 70 खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीने संदर्भित केलेले 12 ते 15 हजार रुग्णांवर उपचार इथे करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Devendra Fadnavis : राज्य शासनाच्या विविध योजना नीटपणे राबविण्याचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येते.  राज्यातील आरोग्य सेवेची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, त्यादृष्टीने राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मावळ तालुक्यातील आंबी- तरंगवाडी येथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक…

दरम्यान, आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात 10 वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात असे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाने असेच कार्य सुरू करून नवनवीन ठिकाणी रुग्णालय आणि शैक्षणिक संकुल उभे करावे. त्यामागे समाजसेवेची भूमिका असल्याने शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच मुलींना वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. यातून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तार आणि गुणवत्ता दिसून येत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात विमा आणि सेवेची खात्री…

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात विमा आणि सेवेची खात्री या माध्यमातून गरीब रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. राज्यात प्राथमिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासह द्वितीयस्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येतात, तसेच विशेषोपचारासाठी शासकीय रुग्णालये, विद्यापीठांची आणि खासगी रुग्णालये आहेत. महाराष्ट्रात शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संधी मिळवून देण्याचे काम डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews