Marathi News

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडाडून विरोध; थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

Written by:Rohit Shinde
Published:
कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव दिला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंतर आक्रमक भूमिका घेतली आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडाडून विरोध; थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव दिला असून, यामुळे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि कृष्णा खोऱ्यातील भागांना पूराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटक सरकारने तसा काही निर्णय घेतल्यास आम्ही थेट सुप्रीम कोर्टात जाऊ, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका

अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कर्नाटक सरकारकडून पुन्हा एकदा अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी अलमट्टी उंची वाढणे धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. हाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान 2019 साली झालेल्या करारानुसार 15 ऑगस्टपूर्वी कर्नाटकने अलमट्टीतील पाणीसाठा 517 मीटरपेक्षा खाली ठेवायचा आहे, पण कर्नाटकने हा करार पाळलेला नाही.

सांगली, सातारा, कोल्हापुरला पूराचा धोका

2019 मध्ये अलमट्टी धरणातील विसर्गाचे योग्य नियंत्रण न केल्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापुरात भीषण पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. धरणाच्या उंची वाढीमुळे केवळ पूर धोका वाढणार नाही, तर हजारो नागरिकांचे जीवन, त्यांची मालमत्ता आणि शेतीही धोक्यात येणार असल्याने, कर्नाटक शासनाने हा निर्णय तात्काळ थांबवावा, असा ठाम आग्रह मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे धरला आहे. त्यांनी कृष्णा खोऱ्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने मध्यस्थी करावी, अशीही मागणी केली आहे.
2021 आणि 2023 सालच्या महापुरात हे दिसून आले होते. कर्नाटकने जून-जुलैमध्येच अलमट्टी धरण पूर्ण भरून घेतले होते. परिणामी, कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापुराचे पाणी चालल्यानंतर कर्नाटकने अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर महापूर ओसरला होता. त्यामुळे आता या प्रकरणात कर्नाटक सरकार नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews