जन्म नागपूरचा मात्र कर्मभूमी मुंबई, मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरे बंधूंना उत्तर, कुणाकुणाला बाहेरचं ठरवणार?

Written by:Smita Gangurde
Published:
कोविड सेंटर घोटाळा, पत्रा चाळ घोटाळा, मिठी नदी कचरा वाहतूक घोटाळा, दलित वस्ती योजनेत घोटाळा झाल्याची टीका फडणवीस यांनी केलीय. घोटाळेबाजांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाशीही घोटाळा केला, हिंदुत्वाची साथ सोडली, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
जन्म नागपूरचा मात्र कर्मभूमी मुंबई, मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरे बंधूंना उत्तर, कुणाकुणाला बाहेरचं ठरवणार?

मुंबई – जन्म मुंबईत झाला नसला तरी कर्मभूमी मुंबई आहे,, असे ठासून सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या टीकेचा समाचार घेतलाय. मुंबईच्या विकासाचा ध्यास घेतला असून, मुंबईकरांच्या जगण्यात परिवर्तन घडवून आणायचं काम भाजपा आणि महाययुतीनं केल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

मुंबईचे प्रश्न समजण्यासाठी मुंबईत जन्माला यायला हवं, अशी टीका फडणवीस यांच्यावर ठाकरे बंधूंकडून संयुक्त मुलाखतीत करण्यात आलीय. याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ही कर्मभूमी असल्याचं सांगत ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबईत जन्माला आलो नसल्यानं मुंबईच्या समस्या माहीत नाहीत असं ठाकरे बंधू म्हणतात, मात्र मुंबईत जन्माला आलो म्हणणारे आणि आम्हालाच कळतं असं म्हणणारे हे जवान आता म्हातारे व्हायला आलेत, पण गेल्या 25 वर्षांत सत्तेत असूनही एकही दाखवण्यासारखं काम यांनी केलेलं नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केलीय.

कुणाकुणाला बाहेरचे ठरवणार- फडणवीस

अशा ठाकरे बंधूंना केवळ मुंबईत जन्माला आले म्हणून हार-फुले वाहायची का, असा सवालही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय. ज्या 106 हुतात्म्यांनी मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, त्यातील काही कोकणातले होते काही पश्चिम महाराष्ट्रातले होते, त्यांनाही बाहेरचे ठरवणार का, असा सवाल फडणवीस यांनी केलाय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, आचार्य अत्रे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचं मुंबईवर प्रेम होतं मात्र त्यांचं जन्म महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झाला होता, त्यांना मुंबई समजत नव्हती, असं यांना म्हणायचं आहे का, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी विचारलाय.

ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्तेत असताना मुंबई महापालिकेत 3 लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय. रस्ते, नालेसफाई, कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करुन दिलीय. पीपीई घोटाळा, ऑक्सिजन प्लँट घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, पत्रा चाळ घोटाळा, मिठी नदी कचरा वाहतूक घोटाळा, दलित वस्ती योजनेत घोटाळा झाल्याची टीका फडणवीस यांनी केलीय. घोटाळेबाजांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाशीही घोटाळा केला, हिंदुत्वाची साथ सोडली, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

Follow Us :GoogleNews