Marathi News

विधिमंडळ परिसरात हाणामारी, पडळकर आणि आव्हाड समर्थक एकमेकांना भिडले

Written by:Smita Gangurde
Published:
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात अहवाल मागवला असून कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय.
विधिमंडळ परिसरात हाणामारी, पडळकर आणि आव्हाड समर्थक एकमेकांना भिडले

मुंबई- विधिमंडळ परिसरात जोरदार हाणामारी झाली. शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत जोरदार हाणानमारी झाली. गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला होता, त्यावरुन ही हाणामारी झाल्याचं सांगण्यात येतंय.

पडळकर समर्थक आणि आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख यांच्यात विधिमंडळाच्या इमारतीत हाणामारी झाली. यावेळी एकमेकांना शिविगाळ करण्यात आली आणि एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत वेळ आली. या मारहाणीचे गंभीर पडसाद विधिमंडळात उमटले. सर्वपक्षीयांनी या हाणामारीच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

नेमका वाद कशामुळे?

११ जुलैला गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड एकमेकांसमोर येत असताना आव्हाडांनी पडळकांना उद्देशून मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर १६ जुलैला पडळकर आणि आव्हाड समर्थक कार्यकर्त्यांत गाडीच्या दरवाजा उघडण्यावरुन बाचाबाची झाली. दोन ते तीन दिवसांपासून आव्हाड यांना मारण्याचे मेसेज येत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय. मोक्का लावलेले आरोपी विधिमंडळात होते आणि ते गेले दोन ते तीन दिवसांपासून मारहाणीच्या तयारीत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय.

विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

या मारहाणीच्या प्रकरणानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात अहवाल मागवला असून कठोर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय.

विधिमंडळ सुरक्षित नाही का, विरोधकांचा सवाल

विधिमंडळात हाणामारी होत असेल तर आमदार कसे सुरक्षित असा सवाल उद्धव ठाकरेंपासून अनेक आमदारांनी उपस्थित केलाय. विधिमंडळात वाद होतात मात्र मारहाणीची घटना अत्यंत निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.

गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी

या सगळ्या प्रकारानंतर गोपीचंद पडळकर यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेऊन त्यांना समज दिली. त्यानंतर विधानसभेच्या प्रांगणात अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं सांगत पडळकरांनी घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो असं पडळकर म्हणालेत. तर जितेंद्र आव्हाड यांनीही बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हे वादाचं प्रकरण संपल्याची घोषणा केली. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घेऊ असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय.

Follow Us :GoogleNews