Municipal councils in Ambernath and Akot : भाजपानं अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि अकोटमध्ये एमआयएमशी केलेल्या हातमिळवणीवरून आज राजकारण तापलं. या युतीवरून मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे. या अनैसर्गिक आघाड्या करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या आघाड्या तुटणार असल्या तरी यानिमित्तानं विरोधकांच्या हातात टीकेसाठी मुद्दा मात्र मिळालाय.
अंबरनाथ, अकोटमध्ये भाजपा आघाड्यांवर मुख्यमंत्री नाराज
राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा सुरु असताना अंबरनाथ आणि अकोटमध्ये नगरपरिषदेत सत्तेसाठी भाजपानं केलेल्या आघाड्या टीकेचा विषय ठरल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी अंबरनाथमध्ये भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अंबरनाथ विकास आघाडी अस्तित्वात आली. तर अकोटमध्ये बहुमतासाठी भाजपानं अकोट विकास मंचची स्थापना केली, त्यात ठाकरेंची शिवसेना, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम एकत्र आले.
काँग्रेस आणि एमआयएमशी हातमिळवणी करणाऱ्या भाजपावर ठाकरे शिवसेनेकडून सडकून टीका करण्यात आली आहे. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर ही भाजपची भूमिका, अशी खरमरीत टीका संजय राऊतांनी केली आहे. तर काँग्रेस आणि एमआयएमनं अशी कोणतीही आघाडी करण्यात आलेली नाही, अशी भूमिका घेतलीय. शिंदेंच्या शिवसेनेसारख्या सहकारी पक्षानं आणि विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यानी याची गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेस आणि एमआयएमशी युती खपवून घेतली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
1. स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही.
2. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही.
3. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल.
4. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे.
5.ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल
मुख्यमंत्र्यांच्या या पवित्र्यानंतर अंबरनाथ आणि अकोटमध्ये अनैसर्गिक आघाडी होणार नाही, हे स्पष्ट झालंय. भाजपाकडूनही कुणाशीही आघाडी करण्यात आलेली नाही, असं आता सांगण्यात येतंय. या सगळ्या प्रकारानं सत्तेसाठी भाजपा तत्वांना तिलांजली देऊ शकते, असा संदेश मात्र गेलाय. तसंच महापालिका निवडणुकीत भाजपाविरोधी प्रचाराचा मुद्दा विरोधकांच्या हाती लागलाय. मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेत या आघाड्या रोखल्या असल्या तरी या सगळ्या घटनेचा परिणाम महापालिका निवडणुकांत होणार का, हे आता पाहावं लागणार आहे.





