‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचे निकष बदलणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Written by:Rohit Shinde
Published:
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या मागणीचा विचार करुन आता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेचे निकष बदलणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यावर अवलंबून न राहता सौरऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसरात्र पाणी मिळू शकते. यामुळे वीज बचत होते तसेच पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही. सौर पंपांमुळे शेती अधिक शाश्वत आणि किफायतशीर बनते. शेतकरी पिकांना योग्य वेळी पाणी देऊन उत्पादनात वाढ करू शकतात. विजेच्या लोडशेडिंगची समस्या दूर होते आणि शेती अधिक स्वावलंबी होते.
या योजनेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शेती व्यवसायात नवी ऊर्जा निर्माण होते. आता याच योजनेच्या निकषांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.

योजनेच्या निकषांत बदल होणार

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात बदल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या मागणीचा विचार करुन आता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांकडून निकष बदलण्याची मागणी होत आहे. ऊर्जा विभागाने समस्या लक्षात घेऊन मार्गदर्शक सूचना काढाव्यात.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीने काम करताना महावितरण, महापारेषण व महानिर्मिती यांच्याशी संवाद वाढवून कामे गतीने करावीत. महापारेषण कंपनीने सन 2024-25 या चालू आर्थिक वर्षात नफा अंदाजे 1800 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. महापारेषण कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे मापदंड पूर्ण करत चांगली कामगिरी केलेली आहे. यामध्ये सातत्य राखून आगामी वर्षातही यापेक्षा अधिक सरस कामगिरी महापारेषणकडून होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

योजना काय? अर्ज कसा करायचा?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार 3,5,7.5 अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किंमतीच्या 10% रक्कम, तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किंमतीच्या 5 % रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे.

मागेल त्याला सौर पंप योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कधीही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज जवळच्या महावितरणच्या कार्यालयात जाऊन करता येतो. ऑनलाईन अर्ज महावितरणची अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in वर शेतकरी स्वत: करू शकतात.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews