महाराष्ट्रात दोन दिवस अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील ‘चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्याच्या चारही विभागांत पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेली प्रणाली 27 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडेल. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मोंथा चक्रीवादळामुळे पावसाचा धोका वाढला !
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वादळ सध्या आग्नेय बंगालच्या उपसागरात केंद्रित आहे आणि ते पश्चिमेकडे सतत सरकत आहे. शनिवारी हे चक्रीवादळ पोर्ट ब्लेअरच्या 460 किमी पश्चिम-नैऋत्येस, चेन्नईच्या 950 किमी पूर्व-आग्नेयेस आणि काकीनाडाच्या 970 किमी आग्नेयेस स्थित होते. 26 ऑक्टोबर रोजी तीव्रतेने खोल दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाले आणि 27 ऑक्टोबर रोजी सकाळी चक्रीवादळात रूपांतरित होईल. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी हे चक्रीवादळ शिगेला पोहोचेल आणि संध्याकाळी किंवा रात्री आंध्रप्रदेश किनाऱ्यावरील काकीनाडाजवळ धडकेल. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे. प्रशासनाने आंध्रप्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे.
वादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार?
बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेल्या कमी दाब्च्या क्षेत्रामुळे बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंहईसह लगतच्या परिसरांना सुद्अधा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून 450 किमीवर आहे. त्याचे रुपांदर कदाचित तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर जात असले तरी सोमवारी त्यात बदल होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता आहे.
29 ऑक्टोबरनंतर पावसाची पूर्णपणे उघडीप ?
दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस 29 ऑक्टोबरनंतर पूर्णपणे उघडीप देईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. 25 ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यानच्या काळात राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस बरसण्याच्या अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे.






