Marathi News

Jalgaon Mumbai Airplane: आता जळगावहून मुंबईसाठी दररोज विमानसेवा; अवघ्या दीड तासात मुंबई गाठता येणार!

Written by:Rohit Shinde
Published:
उत्तम प्रतिसादामुळे 26 ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे.
Jalgaon Mumbai Airplane: आता जळगावहून मुंबईसाठी दररोज विमानसेवा; अवघ्या दीड तासात मुंबई गाठता येणार!
महाराष्ट्रात राज्यांतर्गत विमानसेवेचे जाळे झपाट्याने वाढत आहे. विविध शहरांना जोडणाऱ्या नव्या उड्डाणांमुळे प्रवास सुलभ, वेगवान आणि सोयीस्कर झाला आहे. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांमध्ये विमानसेवा सुरू झाल्याने व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि प्रशासन क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. या सेवेने ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर कमी केले असून विकासाला नवे बळ मिळाले आहे.

राज्य सरकारच्या उड्डाण योजना आणि केंद्राच्या ‘उडान’ योजनेमुळे हवाई प्रवास सामान्य जनतेसाठीही परवडणारा झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विमान वाहतुकीच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे. आता जळगाव देखील राज्यांतर्गत हवाई वाहतुकीचे एक महत्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. आता जळगाव-मुंबई दररोजची विमानसेवा देखील सुरू झाली आहे.

जळगावातून मुंबईला दररोज विमान

जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली मुंबई-जळगाव विमान सेवा आता दरोरज सुरू होणार आहे. मुंबईहून जळगावसाठी आणि जळगावहून मुंबईसाठी आता दररोज विमान उड्डाण घेणार आहे. यामुळे जळगावकरांना आता कोणत्याही दिवशी मुंबई अगदी दीड तासांत गाठणं शक्य होणार आहे. 26 ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमान दररोज उड्डाण करणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली जळगाव-अहमदाबाद विमानसेवा देखील पुन्हा सुरू झाली आहे. दिवाळीच्या काळात या दोन्ही सेवा सुरळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव-मुंबई सेवेला मोठा प्रतिसाद

उड्डाण योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. यापैकी अलायन्स एअर कंपनीकडून मुंबईसाठी आठवड्यातून चार दिवस सेवा दिली जात होती. परंतु मुंबईकडे व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या या उत्तम प्रतिसादामुळे 26 ऑक्टोबरपासून अलायन्स एअरची जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे.

सध्या 26 ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर जळगावहून मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. 26 ऑक्टोबरनंतर मात्र ही सेवा दोन्ही बाजूने दररोज उपलब्ध असेल.

विमान सेवेचे वेळापत्रक

मुंबई-जळगाव विमान सेवा

उड्डाण वेळ: सायंकाळी 7:10 वाजता

आगमन वेळ: रात्री 8:25 वाजता

जळगाव-मुंबई विमान सेवा

उड्डाण वेळ: रात्री 8:50 वाजता
आगमन वेळ: रात्री 10:10 वाजता
त्यामुळे आता या नव्या आणि वाढीव विमानसेवेमुळे जळगावकरांना आगामी काळात मोठा दिलासा खरंतर मिळणार आहे. जळगावच्या नागरिकांमधून देखील या निर्णयाचे सध्या स्वागत होताना दिसत आहे. आगामी काळात आणखी इतर शहरांनी जोडणारी सेवा देखील सुरू होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews