Marathi News

दत्ता भरणेंनी कृषिमंत्री म्हणून कारभार हाती घेतला; शेतकरी कर्जमाफीचं काय होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
दत्ता भरणेंनी कृषिमंत्री म्हणून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. भरणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत कामाची रूपरेषा ठरवली आहे. शेतकरी कर्जमाफीचे काय होणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दत्ता भरणेंनी कृषिमंत्री म्हणून कारभार हाती घेतला; शेतकरी कर्जमाफीचं काय होणार?

विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना रमी खेळत असलेल्या व्हिडीओमुळे अडचणीत सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली आणि दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आज दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर आता राज्यात शेतकरी कर्जमाफीचे काय होणार असा सवाल विचारला जात आहे. त्यामध्ये दत्तात्रय भरणेंनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आपल्या कामाची रूपरेषा ठरवल्याची माहिती समोर येत आहे.

शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणार – भरणे

“मुख्यमंत्र्यांनी मला कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. आज मी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, त्यामुळे मला हे खातं मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मी घेणार आहे,” असंही पुढे भरणेंनी म्हटलं आहे. ” मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. मी पूर्णपणे मदत करेन असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते मी करणार आहे, ” असे मत भरणेंनी मांडले आहे.

भरणेंची उल्लेखनीय राजकीय कारकीर्द

दत्तात्रय भरणे यांचा जन्म पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवी घेतली असून, राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सहकार क्षेत्रात काम केलं आहे. 1992मध्ये ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. 2000 मध्ये त्यांनी या पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवले आणि 2002मध्ये ते साखर कारखान्याचे प्रमुख बनले. सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व यामुळे त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळाली.

भरणे यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यांनी 2019मध्ये पुन्हा हाच मतदारसंघ जिंकला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर आता पुन्हा एकदा भरणेंना राज्याचे कृषिमंत्रीपद मिळवले आहे.

शेतकरी कर्जमाफी मिळणार का?

कृषिमंत्रीपदाची घोषणा झाली त्यावेळी मंत्री दत्ता भरणेंना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर अत्यंत सावध असे उत्तर दिले होते. “अजून मी चार्ज घेतलेला नाही. संपूर्ण माहिती घेईन. माहिती घेतल्यावर निश्चित आपल्याशी बोलेनं. माझ्या शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल, प्रश्न कसे सोडवता येतील हा माझा प्रयत्न आहे” असं दत्तात्रय भरणे म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, कृषी खात्यासाठी रोडमॅप काय असेल? या मुद्दावर ते म्हणाले की, “पदभार संभाळल्यानंतर यावर बोलणं उचित ठरेल. माझ्या शेतकरी बांधवासाठी जे काही करता येईल, ते करण्याचा माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न असेल” भरणेंच्या या उत्तराने संभ्रम वाढला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews