महाराष्ट्रात पाच प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत, जी हिंदू धर्मातील अतिशय पवित्र मानली जातात. ही पाच ज्योतिर्लिंगे म्हणजे त्र्यंबकेश्वर (नाशिक), भीमाशंकर (पुणे), औंढा नागनाथ (हिंगोली), घृष्णेश्वर (औरंगाबाद), आणि परळी वैजनाथ (बीड). त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीच्या उगमस्थानी स्थित असून शिवाचे तीन मुख येथे दर्शवले जातात. भीमाशंकर हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असून निसर्गरम्य परिसरात आहे. औंढा नागनाथ हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. घृष्णेश्वर हे वेरूळ लेण्यांच्या जवळ असून फार प्राचीन आहे. परळी वैजनाथ याला मोक्षदायी ज्योतिर्लिंग मानले जाते. ही पाचही स्थाने भाविकांच्या अपार श्रद्धेचे केंद्र आहेत. अशा या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात भक्तांची रिघ लागते. या श्रध्दास्थान असणाऱ्या ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला आता राज्यात खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.
विकास आराखडा अंमलबजावणीला गती मिळणार!
राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करतील. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे या ज्योतिर्लिंगाचा कायापालट वेगाने होण्यास मदत होणार आहे.
दर्जेदार कामांसाठी सरकारकडून सतत पाठपुरावा
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत, यासाठी संबंधित अधिकारी समन्वय साधणार आहेत. अशा पद्धतीने विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय, संनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.






