Marathi News

लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू; तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का?

Written by:Rohit Shinde
Published:
आता जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू; तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का?

लाडकी बहीण योजनेचा बहुप्रतिक्षीत असा जून महिन्याचा हप्ता वितरीत होण्यास सुरूवात झाली आहे. महिलांना मागील जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षा लागून राहिली होती. लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला थेट बँकेत जमा करण्यात येत असतो. मात्र, जुलै महिना उजाडल्यानंतरही जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नव्हता त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत होता. पण आता जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झाली आहे.

मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत जून महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.”

आपल्या पोस्टमध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी पुढे म्हटलं, “महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.”

बँक खात्यातील रक्कम कशी पाहावी?

लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस (SMS) येईल. बँकेकडून एसएमएस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता. डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता. त्यामुळे तुम्ही देखील लाभार्थी असाल तर तात्काळ तुमचे बँक खाते तपासा.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews