मराठा समाजाला नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या कामाला गती मिळाली आहे. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मराठवाड्यात अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कुणबी नोंदी आढळलेल्या लातुरातील दोन जणांना आज कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे. धाराशिवमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्यसाधून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले. असे वाटप ठिकठिकाणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे ओबीसी नेत्यांना संताप अनावर झाला आहे.
प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करून त्यानुसार मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. त्यासाठी शासन निर्णय ही काढला. आता गावातील नोंदी आणि शिफारशींआधारे जात प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रक्रिया पण सुरू झाली आहे. त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणासह सरकारी नोकऱ्य़ांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येईल. त्यासाठी जीआरमध्ये काही निकष देण्यात आले आहेत. त्यासाठी विहित पद्धतीने अर्ज करता येईल. त्याआधारे कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. सुरूवातील तुम्ही गाव पातळीवरील समितीचा आधार घेऊ शकता. गावात ग्रामपंचायतीमध्ये जुन्या नोदींची यादी उपलब्ध करण्यात येणार आहे.
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदारांना आपलं सरकार पोर्टल उघडावं लागेल. aaplesarkar.mahaonline.gov.in यावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. अर्जातील तपशील व्यवस्थित भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ते त्यासोबत कागदपत्र जोडावी लागतील. तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज आणि कागदपत्रं जमा करावी लागतील.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड,मतदार ओळखपत्र अथवा रहिवासी प्रमाणपत्र
खासरा, जमिनीशीसंबंधित जुना रेकॉर्ड, 7/12, 8-अ उतारा
कुणबी असल्याबाबतचा जुना सरकारी दाखला
वंशावळ अथवा कुटुंबातील आजोबा,पणजोबा,खापर पणजोबा यांची नोंद दर्शवणारा दस्तावेज
कुणबी नोंद असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला
घरातील कुटुंब प्रमुखाचे असलेले जुने जात प्रमाणपत्र
अखेरची पडताळणी नेमकी कशी होणार?
तहसीलदारांच्या कार्यालयातील एक समिती सुरुवातीला अर्जाची प्राथमिक चौकशी करेल. माहिती योग्य आढळल्यास, त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर कुणबी जात प्रमाणपत्र जारी केले जाईल. कोणत्याही माहितीमध्ये विसंगती आढळल्यास अर्जदाराला स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावले जाईल. यासोबतच प्रशासनाने खोटे दस्तऐवज सादर करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. बनावट पुरावे सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.
छगन भुजबळांची नाराजी
मराठा समाजाला आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र आधीच शोधून ठेवली होती का ते पहावे लागेल, ती 2 सप्टेंबरच्या आधी शोधली होती का, दिलेली पत्र योग्य आहेत का? तेही तपासायला हवे, अशी पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. मराठवाड्यात आज हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे पुरावे आढळलेल्यांना मराठा-कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे एकीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठवाड्यातील मराठा बांधव आनंदी आहेत. मात्र, दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी प्रमाणपत्रावर शंका उपस्थित केल्या आहेत.






