पालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना आता मुंबईचा लढा आठवला का?, एकनाथ शिंदे यांची उबाठावर टिका

Written by:Astha Sutar
Last Updated:
भारतीय लष्कराने फक्त २० मिनिटांत पाकिस्तानची चरबी उतरवली. मात्र शाबासकी देऊन पाकिस्तानची भाषा काहीजण बोलत आहेत त्यांना निशाण ए पाकिस्तान पदवी द्यायला हवी. भारतात झिरो आणि पाकिस्तानात हिरो बनलेल्या राहुल गांधींवर उपमुख्यमंत्री शिंदे सडकून टीका केली.
पालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना आता मुंबईचा लढा आठवला का?, एकनाथ शिंदे यांची उबाठावर टिका

Eknath Shinde – गुरुवारी शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन साजरा झाला. शिंदे गटाचा वरळीतील डोम येथ वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टिका केली. मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, कुणाचा बाप जरी आला किंवा सात पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे. इतकी वर्ष सत्तेत राहुन महापालिकेची तिजोरी फोडणाऱ्यांना मुंबईचा लढा आठवला, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला.

उबाठा सत्तेसाठी लाचार…

आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता. आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार जिवापाड जपलं. त्यामुळेच शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.

पालिकेची तिजोरी फोडली…

दरम्यान इतकी वर्ष तुम्ही सत्तेत होता. तेव्हा पालिकेची तिजोरी फोडली आणि आता सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा आठवलाय, लढण्यासाठी घराबाहेर पडावं लागते. लोकांशी संवाद साधावा लागतो. आता तुम्ही जे काही बाहेर पडताय ते आमच्यामुळे पडताय, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. कोविड सेंटर, खिचडी, बॉडीबॅग, कचरा, मिठी नदी गाळ, रस्त्यांवर खड्डे आणि डांबरात पैसे खाल्ले आणि मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ केलात. आता त्यांना मुंबईचा लढा आठवला. मिठी नदीच्या मगरमिठीतून कोणी सुटणार नाही. आता एकाची चौकशी सुरु आहे, त्याने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, असा हल्लाबोल शिंदेंनी ठाकरेंवर केला.

ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका पटवून देण्यासाठी खासदारांच्या शिष्टमंडळासोबत परदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कौतुक केले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews